आ) सायकलीला वाहतुकीचे नियम लागू नाहीत असा एक सार्वत्रिक (म्हणजे सर्व शहरांमधला) समज (किंवा गैरसमज) आहे.
इ) यथावकाश नागरिकांची क्रयशक्ती वाढली, आणि सायकलींची जाग स्कूटर/मोटरसायकलींनी घेतली. जे पूर्वी सायकली चालवायचे, ते मोटरसायकली चालवू लागले.... पुर्वीएवढेच नियम पाळून.

सायकल चालवत असताना काहीही झाले आणि बाकी काहीही करता आले नाही किंवा करावयास सुचले नाही तरी पाय जमिनीला टेकवून आणि जमिनीवर घासून सायकल बहुतांश वेळा* जागच्याजागी थांबवता येतेच येते, तर मोटारसायकलीवर किंवा इतर (स्वयंचलित) वाहनांत तसे करता येत नाही, या मूलभूत बाबीचा सायकलस्वारापासून मोटारसायकलस्वारापर्यंतच्या संक्रमणात सामूहिक पातळीवर (अनवधानाने किंवा कदाचित सोयिस्कररीत्या) पडलेला विसर हाही या बाबीचा एक मूलभूत पैलू येथे लक्षात घेण्यासारखा आहे.

*सायकलीचा वेग सहसा मर्यादित असल्याने हे जवळपास प्रत्येक परिस्थितीत करता येण्यासारखे असले (आणि बऱ्याचदा प्रत्यक्षात अवलंबलेही जात असले) तरी क्वचित काही परिस्थितीत हा मार्ग अवलंबता येणे शक्य नसावे. उदाहरणार्थ, नीलायम चित्रपटगृहाजवळच्या प्रचंड चढ (किंवा दुसऱ्या बाजूने बघितल्यास प्रचंड उतार) असलेल्या पुलाच्या पर्वतीकडील बाजूहून स. प. महाविद्यालयाकडील बाजूच्या दिशेने सायकलीवरून जाताना सायकल गुरुत्वाकर्षणाच्या भरवश्यावर सोडून दिल्यानंतर वाटेत अचानक थांबण्यासरखी परिस्थिती आल्यास (१) हा मार्ग सुचत नाही, (२) हा मार्ग सुचला तरी उपयोग नसतो, (३) अशा वेळी प्रतिक्षिप्त क्रियेने ब्रेक दाबला जातो, आणि (४) अशा वेळी ब्रेक दाबण्याचाही फारसा उपयोग नसतो या बाबींचा, तसेच (५) अशा परिस्थितीत प्रतिक्षिप्त क्रियेने नेमका (फक्त) पुढच्या चाकाचा ब्रेक दाबला गेल्यास नक्की काय होते याचाही सुखद आणि अवर्णनीय अनुभव प्रस्तुत प्रतिसादकर्त्याने स्वतः घेतलेला आहे. (गोष्ट साधारणपणे २७ वर्षांपूर्वीची आहे. नीलायम चित्रपटगृह आणि त्याजवळील तो पूल अजूनही पुण्यात अस्तित्वात आहेत की नाहीत याची प्रस्तुत प्रतिसादकर्त्यास कल्पना नाही. नसल्यास पुलाच्या चढाची - किंवा उताराची - नेमकी कल्पना देण्यासाठी पुण्यातील पर्यायी उदाहरण प्रस्तुत प्रतिसादकर्त्याजवळ नाही.)