कवितेला शंतनू नांव देण्याचे कारण असे आहे :
महाभारतामध्ये सुरुवातीस असलेल्या कथानकानुसार ई़क्ष्वाकू कुलातील महाभीष राजा स्वर्गात गेल्यानंतर देवसभेत बसलेला असताना गंगेकडे अभिलेषेने पाहातो. त्याच्या या मानवी वर्तनाचा परिणाम म्हणून ब्रह्मदेवाच्या शापामुळे महाभीष आणि गंगा या दोघांनाही पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. हा महाभीष राजा पुढे कुरुकुलातील प्रतीप राजा व त्याची पत्नी तनू यांच्या पोटी शंतनू नांवाने जन्मला. गंगेपासून त्याला झालेल्या पुत्रांपैकी पहिले सात गंगेच्या इच्छेप्रमाणे गंगा नदीच्या पात्रात बुडविले गेले. आठव्या पुत्राच्या वेळी शंतनुने जेव्हा असे करण्यास विरोध केला, तेव्हा गंगा पूर्वकराराप्रमाणे शंतनुला सोडून स्वर्गात निघून गेली. शंतनु पुढे तो आठवा पुत्र, ज्याचे नांव देवव्रत (भीष्म) होते, तो विवाहयोग्य झाल्यानंतरही, पुन्हा मत्स्यगंधेच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी त्याने विवाह केला. सुंदर स्त्री पाहिली की तिचे आकर्षण पुरुषाला नैसर्गिकरित्या वाटत राहाते. तेथे वयाचा बंध नसतो. ती वृत्ती शंतनुच्या वर्तनातूनही दिसते आणि आजही प्रत्ययास येते. या सनातन नैसर्गिक वृत्तीला अनुलक्षून कवितेस 'शंतनू’ नांव द्यावेसे वाटले.