वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पुराणांची निर्मिती इ. स. ४ थे शतक ते जवळ जवळ १९ व्या शतकापर्यंत त्यात भर पडलेली दिसते.

पुराणांत लिहिण्याची पद्धत ही घडून गेलेली गोष्ट 'घडणार  आहे' अशा पद्धतीने सांगितलेली आहे. पुराणकर्त्यांना भविष्याचं ज्ञान आहे असं दाखवून काहीतरी जादू केल्याचा भाव त्यात आणला आहे. आपण लिहितो ते वेदांच्या तोडीचं आहे असं सांगण्याचा पुराणकर्त्यांचा हेतू आहे. त्या दृष्टीने पुराणे म्हणजे त्या काळच्या लोकांनी करमणूकीसाठी लिहिलेले साहित्य असे म्हणण्यात काही अंशी तथ्य आहे.

उदा. अमुक अमुक वर्षी गुप्त नावाचं राजघराणं अस्तित्त्वात येणार आहे. त्यातला अमुक नावाचा राजा कर्तबगार निघेल वगैरे उल्लेख गुप्तांच्या कालखंडानंतर पुराणांत सापडतात.

भविष्य, भविष्योत्तर आणि स्कंद पुराणात १९ व्या शतकापर्यंत भर पडलेली आहे. ब्रिटिशांचा उल्लेख भविष्योत्तर पुराणांत आहे, मात्र तो ब्रिटिश भारतात असताना किंवा त्यानंतरचा आहे. तसेच सत्यनारायण महापूजेचा उल्लेखही स्कंद पुराणात १९ व्या शतकाच्या सुमारासचा आहे. १८-१९ व्या शतकाआधी सत्यनारायण किंवा त्याची पूजा अस्तित्त्वात नव्हती.

पुराणे 'भविष्य सांगतात' या दृष्टीने जरी करमणूक करणारी असली तरी त्यात दिलेली माहिती मात्र अधिकृत आहे हे इतर पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे.

पुराणांचा प्राचीन भारताच्या इतिहासाच्या पुनर्बांधणीत महत्त्वाचा सहभाग आहे. अनेक मोठमोठे राजे, त्यांचे राज्यविस्तार, कालखंड,  राजांची नामावली इत्यादी उपयुक्त माहितीमुळे  प्राचीन भारताचा इतिहास सुसूत्रपणे बांधण्यास पुराणांची मदत झालेली आहे.

गुप्त, सातवाहन, वर्धन, मौर्य (विष्णुपुराण) इत्यादी अनेक राजवंशांची माहिती पुराणात मिळते.

सातवाहन राजांची पुराणातील यादी आणि नाणी, शिलालेख इ.पुराव्यावरून निश्चित केलेली यादी आणि त्यानुसार त्यांचा काल यांत बरेच साम्य आहे. 

सातवाहनांच्या काही राजांची नाणी सापडली आहेत मात्र त्यांचा उल्लेख पुराणातील वंशावळीत नाही तर काही राजांचे उल्लेख वंशावळीत आहेत पण त्यांचे प्रत्यक्ष काहीच पुरावे सापडत नाहीत.