आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी सरकारी कर्मचारी घरी आले, त्यांनी नावे लिहून घेतली, सह्या घेतल्या. कुठलाही पुरावा मागितला नाही. त्यानंतर अनेकदा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येऊन विचारणा करून गेले. यादी प्रसिद्ध झाल्यावर घरी पत्र आले, त्याप्रमाणे जिथे मतदान होणार आहे त्या केंद्रावर दिलेल्या वेळेत जाऊन फ़ोटोग्राफ़रला छायाचित्र काढू दिले. पुढील दहा मिनिटात हातात ओळखपत्र पडले. त्यातील शुद्धलेखनाच्या आणि पत्त्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज दिला. महिनाभरात नवीन बिनचूक ओळखपत्र घरपोच आले. घरातील दोघेजण फोटोसाठी हजर होऊ शकले नाहीत. त्यांना ओळखपत्र मिळाले नाही, पण मतदारयादीच्या आधारावर व इतर मार्गाने ओळख सिद्ध करून मतदान करता आले.
मतदानकक्ष घरापासून पायी चालायच्या अंतरावर होते. खोल्या तळमजल्यावर असून सकाळच्या वेळात रांग नव्हती. आतील कर्मचारी कार्यकुशल होते. एका मिनिटात मत देऊन बाहेर पडता आले.
आम्हाला यादीचा गोंधळ, अंतराचा त्रास, किंवा जिने चढावे लागणे, असल्या तक्रारी ऐकायलासुद्धा मिळाल्या नाहीत. आमच्यासारखेच इतरांचे अनुभव असावेत.