पुण्यातील निवडणुकीत मला आलेला अनुभव हा माझा अनुभव म्हणून दिला होता. काही लोकांना चांगला अनुभवही आलेला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! भारतात प्रगती झाली आहे याबद्दल शंकेला मुळीच जागा नाहीं. नुकताच सोडण्यात आलेला उपग्रह हा त्याचाच पुरावा आहे.अशा प्रगतीशील देशाला साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत असे नसून त्या करण्याची इच्छा नाही हीच खरी अडचण आहें. काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा वाचला तर आपण किती नेत्रदीपक प्रगती केली आहे हे वाचायला मिळेल फक्त ते अनुभवायला मिळाव
एवढीच इच्छा ! इतका चांगला देश सोडून अमेरिकेत जाण्यासाठी लोक का धडपडतात हे आम्हा इथेच राहणाऱ्या बिचाऱ्यांना कळणे कठीण . आणि आम्हाला येथेच रहायचे असल्याने इथे कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागते याविषयी आम्हीच तक्रार करणार ही टीका या देशावर नसून तेथील राज्यकर्ते आणि नोकरशाहीवर आहे हे काही लोकांच्या लक्षात आलेले दिसत नाही. ती यंत्रणा बदलता यावी म्हणून तर इतक्या अडचणींना तोंड देऊन आम्ही मतदानाला जातो. तीच गोष्ट जरा सुलभ झाली तर लोकांचा उत्साह वाढेल या आशेने हा लेखनप्रपंच !