एखाद्या विषयावरील एखाद्या मताबद्दल अनेकांची सहमती अथवा सहानुभूती म्हणजे १. त्या विषयाचे लक्ष्य असणाऱ्या गटाचे सदस्यत्व किंवा, (तसे नसल्यास) २. पुरोगामित्वाची अहमहमिका (किंवा, ३. दोन्ही) हाही एक साचा असू शकतो. (आणि अशा साच्याचा स्वतःचे मत सहमतीचे/सहानुभूतीपूर्ण असण्यानसण्याशी संबंध नसूही शकतो. ) असो. व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितकी मते (प्रत्येकाला एकएक असते, वगैरे वगैरे...) आणि व्यक्ती तितके साचे. (किंवा, दुसऱ्या शब्दांत, ज्याचे त्याचे साचे, मला काय त्याचे.)

बाकी "लौंडेबाजी"चे उदाहरण तितकेसे पटत नाही. "लौंडेबाजी" या प्रकारात (म्हणजे त्या शब्दावरून मला तरी जो अर्थ समजतो त्याप्रमाणे) शोषणाचा, त्यातसुद्धा अल्पवयीन मुलांच्या शोषणाचा, एक भाग आहे, ज्याचे कोणत्याही परिस्थितीत (समलिंगी किंवा भिन्नलिंगी कोणत्याही संबंधांच्या बाबतीत) समर्थन होऊ शकत नाही. भिन्नलिंगी संबंधांच्या बाबतीत "लौंडेबाजी"ची तुलना "बाई ठेवणे" (कदाचित कमी आक्षेपार्ह, पण कदाचितच!*) आणि "अल्पवयीन मुलीवर बलात्कार" (निश्चितच घृणास्पद) यांच्याशी होऊ शकेल असे वाटते. दोन जाणत्या ('कायद्याने सज्ञान' अशा अर्थी) आणि मानत्या प्रौढांमधील ('कन्सेंटिंग अडल्टस' अशा अर्थी) संबंधांची (मग ते संबंध समलिंगी असोत की भिन्नलिंगी, विवाहबंधनासह असोत की विवाहबाह्य) "लौंडेबाजी"शी तुलना होऊ शकेलसे वाटत नाही.

(* "बाई ठेवणे" हा प्रकारही क्वचित्प्रसंगी दोघांच्या सहमतीने होऊ शकत असावा आणि त्यामुळे दरप्रसंगी नेहमीच यात शोषणाचा भाग असावाच असे नाही, अशी शंका - पण शंकाच, खात्री नव्हे! - येते हे "कदाचित कमी आक्षेपार्ह" या शब्दप्रयोगामागील प्रयोजन.)