"१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले! स्वराज्य आले!! अहो हे सारे रक्ताचा एक ही थेंब न सांडता झाले! जगात या सारखे दुसरे उदाहरण नाही!"
मी वाचले आहेत हे शब्द!
आमच्या हजारो तरुणांच्या बलिदानाचा अपमान करणारे! याच चिडीतून माझी एक धगधगती कविता जन्माला आली! आज त्यातील दोन कडवीच येथे या निमित्ताने हुतात्म्यांना अभिवादन म्हणून देतो.
कुणी झाडली पहिली गोळी, मंगल पांडेने,
रक्ताने मग फास भिजवला हासत मर्दाने!
तात्या टोपे, नाना आणिक राणी झाशीची,
नररत्ने ही बळी जाहली आण अम्हा त्यांची!
सन अठराशे सत्तवन्नी झाले जे यूद्ध,
त्या समरांगणी कितीक झाले गोळ्यांनी विद्ध!
अन रुधिरांचे पाट वाहिले या धरती वरती,
कशी वदावी आम्ही हिजला रक्तहीन क्रांती!
कवी पांगळा गोविंद असो वा अनंत कान्हेरे,
मदनलालजी धिंग्रा किंवा मॅडम कामा रे!
विनायकाचे चेले सारे वीरमणी ठरले,
देशामध्ये आग भडकली लंडन हादरले!
तुरुंगाच्याही भिंती गाती देशभक्ती कवने!
आंदमानचा जेलर हरला, हसली शूर मने!
त्या साऱ्यांची गाता महती कंठ भरून येती,
कशी वदावी आम्ही हिजला रक्तहीन क्रांती?