मोल्सवर्थ-कॅन्डीचा आधार देऊन अर्थ दिल्याबद्दल आभार.  हा अर्थ मला मुळीच माहीत नव्हता. आणखी कुणीकुणी कसे अर्थ दिले आहेत ते पाहण्यासारखे आहे.

वि.वा. भिडे:--पांचांवर धारण बसणें=अत्यंत विस्मित आणि भयभीत होणें. पंचप्राण निघून जातात कीं काय अशा फिकिरींत पडणें. 

दाते-कर्वे:--पांचावर धारण बसणें=पूर्वीं लष्करांत वगैरे फार महागाई झाली म्हणजे रुपयाला पांच शेर धान्य मिळूं लागे व मग सर्व लोक अगदीं हवालदील होऊन जात. कारण सामान्यतः तेव्हां फार स्वस्ताई असे.  याप्रमाणें रुपयास पांच शेर धान्य असा निरख(=बाजारभाव) होणें म्हणजे पांचावर धारण बसणें, म्हणजे अगदीं हलाखीची, निकृष्ट अवस्था होणें.  यावरून अगदीं घाबरून जाणँ, हवालदील होणें, भीतीनें गांगरून जाणें असा लाक्षणिक अर्थ होतो. मॅनवेरिंगने(? ) पांच इंद्रियांवरचा ताबा उडणें हा अर्थ दिला आहे तो चुकीचा आहे.  'मराठ्यांनीं हैबत खाण्याचें(=धास्ती घेण्याचे) कारण दुराणींच्या लक्षांत आलें नाहीं. तरीपण, त्यांची पांचावर धारण बसल्याचें त्यांना स्पष्ट दिसूं लागलें'. --पानिपतची मोहीम(संपादक-ना. वि. बापट). 

'आधुनिक सुधारणेने दिलेल्या दिव्यांच्या योगें जशी "दिव्याखालीं अंधार" ही म्हण खोटी पाडली तशी प्रचलित आश्चर्यकारक महागाईनें पांचावर धारण बसणें ही मूळ अत्यंत महर्गतादर्शक म्हणही पार खोटी ठरवली आहे. '--केसरी ता. १९-१-१९४३, पान ४.

वा. गो. आपटे:--पांचावर धारण बसणें=अत्यंत भयभीत होणें.