माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:
मजल-दरमजल करत आम्ही सगळे होळीच्या माळावर पोचलो. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे. आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??? मनातल्या मनात राजांची क्षमा मागत मुजरा केला आणि मागे वळून चालू लागलो. होळीच्या माळावर उजव्या बाजूला गडाची देवता शिर्काईचे मंदिर आहे. देवीची मूर्ती दशभुजा असून आजही दरवर्षी गडावर देवीचा उत्सव भरतो. अंबारखाना म्हणुन ओळखली जाणारी वास्तु आज पूरातत्वखात्याचे कार्यालय म्हणुन बंद केली गेली आहे.