"मुंबई म्हणजेच महाराष्ट्र" असल्याचा गैरसमज मुंबईबाहेरील उर्वरित महाराष्ट्रात असावा असे वाटत नाही. मुंबईत तो तसा आहे की नाही याची कल्पना नाही, परंतु वादाच्या सोयीसाठी तो तसा आहे असे जरी मानले, तरी मुंबईच्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्राचा (आणि उर्वरित मराठीभाषकांचा) व्याप ('एक्स्टेंट' अशा अर्थी) लक्षात घेता (१) तो वाढीस वगैरे लागण्याची शक्यता वाटत नाही, (२) त्या समजाने उर्वरित महाराष्ट्रास काहीही फरक पडू नये, आणि त्यामुळेच (३) तो धोकादायक वगैरे आहे असे म्हणवत नाही.
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात कुठेही हे दाखवले नाही की
मराठी माणसाचा इतकाच अपमान वगैरे इतर शहरातही होतो काय? एकंदर
महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे दाखवलेले नाही.
हल्ली मराठी चित्रपटउद्योग महाराष्ट्रात कोठे केंद्रित आहे याबद्दल मला खात्रीलायक कल्पना नाही, त्यामुळे चित्रपट कोठे बनला आहे याबद्दल ठाम विधान मला तरी करता येत नसल्यामुळे तो मुद्दा तूर्तास सोडून देणे मला भाग आहे. परंतु चित्रपटाचे लक्ष्य असलेला प्रेक्षकवर्ग ('टार्गेट ऑडियन्स' अशा अर्थी) कोणता, हे लक्षात घेतल्यास याचे एक संभाव्य कारण लक्षात यावे. पण त्याने व्यापक महाराष्ट्रास फारसा फरक पडू नये.
'आपण मराठी आहोत' हे मुद्दाम सिद्ध करण्याची आणि त्यासाठी आपल्या शहराचे प्रमुख रेल्वेस्थानक अथवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पुनर्नामकरण करताना शहराच्या इतिहासाशी सुतराम् संबंध नसलेल्या (परंतु महाराष्ट्राचे मानचिन्ह मानल्या गेलेल्या) शिवाजीमहाराजांना (आणि फक्त शिवाजीमहाराजांनाच) वेठीस धरण्याची हद्द गाठण्यापर्यंत जाण्याची गरज भासणाऱ्या प्रेक्षकवर्गास डोळ्यांसमोर ठेवून असा चित्रपट काढला जाणे सहज शक्य आहे. ज्यांना किंवा जेथे अशी गरज भासत नाही त्यांना किंवा तेथे अशा चित्रपटांचे कौतुक नाहीही असणार कदाचित. फरक कोणाला पडतो?
मला ही परिस्थिती एक चिंतेची बाब यासाठी वाटते कारण यातून
महाराष्ट्राबाबतचे सर्व निर्णय मुंबईवरून करण्याची एक प्रथा पडण्याची
शक्यता आहे.
महाराष्ट्राबाबतचे निर्णय घेणारे (लोकनियुक्त प्रतिनिधी, मंत्री वगैरे) हे मुंबईतच काम करत असले तरी बहुतांश मुंबईबाहेरून आलेले असल्याने (आणि मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर विविध भागांचेसुद्धा प्रतिनिधित्व करत असल्यामुळे) असे होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब वगैरे वाटत नाही.
(किंबहुना लॉबी वगैरे प्रकारांमुळे झालेच तर महाराष्ट्राच्या इतरच कोणत्यातरी भागांवरून महाराष्ट्राबद्दलचे सर्व निर्णय होण्याची शक्यता अधिक.)