कृपया मुंबईबद्दल पुन्हा असं वावगं बोलू नका.
या चर्चाप्रस्तावात तरी मुंबईबद्दल काही वावगे बोललेले निदान मला तरी दिसले नाही.
ती ह्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी नव्हे हृदय आहे.
असे मुंबईकरांना वाटत असेलही कदाचित, आणि ते साहजिकही आहे, परंतु उर्वरित
महाराष्ट्रवासीय मराठीभाषकांनाही असे वाटतेच, नव्हे वाटलेच पाहिजे, हे
गृहीत कशाच्या आधारावर धरायचे आणि उर्वरित महाराष्ट्रवासीयांवर का
लादायचे?
तुमच्या दुसऱ्या मुद्द्याबद्दल म्हणायचं झालं तर, मीही ह्या उपक्रमाला माझ्याकडून ५०१/- रुपयाची मदत केलेली आहे.
त्याने काहीही सिद्ध होत नाही. नाही म्हणजे, तो उपक्रम स्तुत्य असेलही
(किंवा नसेलही), मला त्या उपक्रमाबद्दल काहीच कल्पना नसल्याने त्याबद्दल
मी कोणत्याही बाजूने बोलू शकत किंवा इच्छीत नाही, परंतु आपल्या विधानाने
तो उपक्रम स्तुत्य असण्याला पुष्टी मिळत नाही.
समांतर उदाहरणच घ्यायचे झाले, तर पाकिस्तानात किंवा इतरत्रही अनेक
तथाकथित धर्मार्थ संघटना धर्मकार्यार्थ म्हणून वर्गणी गोळा करत
आणि प्रत्यक्षात मात्र ही अशी गोळा झालेली वर्गणी दहशतवाद्यांच्या
सहाय्यार्थ वापरली जात असे. आता जर एखाद्याने म्हटले की अशी एखादी संघटना
चांगली आहे, कारण मी तिला १०० रुपयांची वर्गणी दिलेली आहे, तर अशी संघटना
केवळ त्या आधारावर चांगली ठरेल काय?
नाही म्हणजे, प्रस्तुत उपक्रमाची एखाद्या दहशतवादी संघटनेशी तुलना करायची नाही, किंवा प्रस्तुत उपक्रमासाठी गोळा करण्यात येणारी रक्कम ही भलतीकडे वळवली जात असण्याची शक्यताही वर्तवायची नाही. (प्रस्तुत उपक्रम काय आहे याचीही खरे तर कल्पना नाही.) एखाद्या उपक्रमासाठी केवळ कोणीतरी काही आर्थिक मदत केलेली आहे यावरून त्या उपक्रमाची योग्यता (किंवा अयोग्यता) सिद्ध होत नाही, एवढेच फक्त म्हणायचे आहे.
राज्याच्या राजधानीचं वर्चस्व हे राज्याच्या प्रत्येक वा अनेक क्षेत्रात पडणं हे स्वाभाविक नाही आहे का?
नाही.
राजधानी ही राज्यासाठी असते, राज्य हे राजधानीसाठी नव्हे, हे लक्षात घेतल्यास यातील फोलपणा लक्षात येईल.
उलटपक्षी, राजधानीचे वर्चस्व राज्याच्या प्रत्येक वा अनेक क्षेत्रात पडते असा भास राजधानीत राहून होणे साहजिक आहे, परंतु तो भ्रामक आहे असे सुचवावेसे वाटते. मुंबईतल्या घडामोडींचा प्रभाव गडचिरोली, परभणी अथवा सातारा येथे फारसा पडत असावा असे वाटत नाही.
मुंबई हे महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांसारखेच एक शहर आहे. ते महानगर आहे, आंतरराष्ट्रीय संपर्क असलेले शहर म्हणून आणि वित्तीय बाबतीत त्याला काही महत्त्व आहे वगैरे बाबी खऱ्याच आहेत. आणि महाराष्ट्रातले (इतर शहरांसारखेच) एक शहर म्हणून महाराष्ट्रालाही मुंबईबद्दल जिव्हाळा आहे. परंतु महाराष्ट्र म्हणजे काय हे मुंबई ठरवत नाही. मुंबईबाहेरही एक मोठा महाराष्ट्र आहे जो अनेक बाबतीत मुंबईपेक्षा वेगळा असू शकतो - किंबहुना प्रत्येक शहर हे आपापल्या परीने इतरांपेक्षा वेगळे असते - आणि मुंबईत काय चालते किंवा काय घडते याचा अनन्यसाधारण ('एक्सक्लूज़िव' अशा अर्थी -शब्द चुकला असल्यास तज्ज्ञांनी जरूर सुधारणा सुचवाव्यात. ) प्रभाव इतर शहरांवर पडू नये आणि पडतही नाही. (हे शेवटचे विधान मुंबईलाच नव्हे, तर कोणत्याही शहराला लागू आहे. ) तो तसा पडतो असा समज असल्यास त्यात तथ्य नाही.
कदाचित राजधानीची शहरे सहसा महानगरांत असल्यामुळे आणि महानगरांत एकंदरीतच 'आपल्या शहराचा प्रभाव सर्वांवर पडतो' असे समजण्याचा कल असल्यामुळे 'राजधानीचे वर्चस्व राज्याच्या प्रत्येक वा अनेक क्षेत्रांत पडणे स्वाभाविक असते' अशी भ्रामक समजूत निर्माण होत असणे साहजिक असावे. (अर्थात राजधानीच्या रहिवाशांत - इतरत्र अशा समजाला फारसा मान असतोच, असे नाही. )
(राजधानीचे शहर हे एखाद्या महानगरात असलेच पाहिजे का, हा मात्र एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.)