मुंबईला केंद्रशासित करण्याची काहीही आवश्यकता नाही, आणि त्याने काही साध्य होण्यासारखेही नाही.
मुळात मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असल्याचा गैरसमज वाढीस लागत आहे आणि हे महाराष्ट्रास धोकादायक आहे हे मला फारसे पटलेले नाही. (का पटलेले नाही याचे सविस्तर विवेचन मी अन्य प्रतिसादात केलेले आहेच.)
मात्र हा धोका आहे असे जरी वादाच्या सोयीकरता मानले, तरी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणे हा त्यावर तोडगा नाही.
मुंबईवर लक्ष केंद्रित झाल्यामुळे जर महाराष्ट्राचा विकास होत नसेल (यावर माझा विश्वास नाही, पण तरीही...), तर त्यासाठी मुंबई हे महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राचेच एक शहर महाराष्ट्रापासून तोडून वेगळे करून त्याचा केंद्रशासित प्रदेश बनवणे म्हणजे डोकेदुखीवर उपाय म्हणून शिरच्छेद करण्यासारखे आहे. (थोडक्यात, मूर्खपणा आहे.)
ही समस्या मुळात आहे हे मी मानत नाही, पण ती जर असेलच, तर ती सोडवण्यासाठी इतर उपाय आहेत.
मुंबई ही जशी भारताची वित्तीय राजधानी आहे, त्याप्रमाणेच न्यूयॉर्क शहर ही अमेरिकेची वित्तीय राजधानी आहे असे म्हणता येईल. न्यूयॉर्क शहर हे ज्या राज्यात वसलेले आहे त्या न्यूयॉर्क राज्यातील न्यूयॉर्क हे (मुंबईप्रमाणेच) एक अतिप्रगत, महत्त्वपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय संपर्क आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेले महानगर - कदाचित न्यूयॉर्क राज्यातले असे एकमेव महानगर - आहे. भौगोलिक स्थान आणि रचना, नगररचना, राहणीमान आणि जीवनपद्धती, सार्वजनिक दळणवळणव्यवस्था, सर्व तऱ्हेचे (अठरापगड जातिधर्मवंशांचे) रहिवासी वगैरे अनेक बाबीत न्यूयॉर्क शहर आणि मुंबई यांची तुलना होऊ शकते. किंबहुना जवळपास प्रत्येक बाबतीत न्यूयॉर्क शहर हे मुंबईचे अमेरिकेतील अगदी प्रतिरूप नव्हे तरी समतुल्य शहर आहे असे म्हणावयास जागा आहे.
मात्र न्यूयॉर्क शहर ही न्यूयॉर्क राज्याची राजधानी नाही.
न्यूयॉर्क राज्याची राजधानी ही अल्बनी नावाच्या एका अत्यंत छोट्या आणि एरवी फारसे महत्त्व नसलेल्या शहरी आहे. किंबहुना अटलांटा, होनोलुलू, इंडियानापोलिस किंवा फिनिक्स यांसारखे तुरळक अपवाद सोडल्यास अमेरिकेतील जवळपास कोणत्याच राज्याची राजधानी ही त्यात्या राज्यातील महानगरात किंवा महत्त्वाच्या शहरात नाही. राज्याची राजधानी ही सहसा एखाद्या छोट्या आणि (राज्याची राजधानी म्हणून आणि कदाचित विद्यापीठाचे गाव म्हणून यांव्यतिरिक्त) एरवी फारसे महत्त्व नसलेल्या एखाद्या शहरात ठेवण्याकडे कल आहे. (किंबहुना विद्यापीठांच्या गावांबद्दलसुद्धा 'आधी विद्यापीठ की आधी राजधानी' हा मला पडलेला प्रश्न आहे. याबद्दलचा इतिहास अभ्यासलेला नसल्यामुळे ठाम विधान करू इच्छीत नाही. )
ब्रिटिशांच्या राजवटीच्या वारशाच्या खुणा पुसून टाकण्यासाठी म्हणून राष्ट्राभिमानापोटी आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर अनेक बदल करण्यात आले. रस्त्यांची नावे बदलली गेली. खुद्द मुंबईत (मुंबईचे मराठीभाषक आणि गुजरातीभाषक रहिवासीच काय, पण अन्यत्र राहणारे मराठीभाषक आणि गुजरातीभाषकसुद्धा आपापल्या मातृभाषांत बोलताना आणि लिहिताना मुंबईला 'मुंबई' असेच संबोधत असताना आणि नेहमीच संबोधत आलेले असताना, आणि मराठीत आणि गुजरातीत नेहमी 'मुंबई' हेच मुंबईचे अधिकृत नाव असतानासुद्धा) मुंबईचे इंग्रजीतील नाव 'मुंबई' असे अधिकृतरीत्या बदलण्यात आले, 'व्हिक्टोरिया टर्मिनस' रेल्वेस्थानकाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' असे करण्यात आले, 'किंग जॉर्ज हायस्कूल'चे नाव बदलून 'राजा शिवाजी विद्यालय' असे करण्यात आले, 'व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट'चे नाव बदलून 'वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट' केले, साधे 'रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'चे नाव बदलून 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' केले, वगैरे वगैरे. आता वस्तुतः यात काही निश्चितपणे गैर आहेच असे म्हणता येणार नाही. (शेवटी मुंबईतील ठिकाणांची नावे काय ठेवायची किंवा बदलायची की नाहीत हे मुंबईकरच ठरवू शकतात, त्यामुळे "पण नावे बदलायची किंवा ठेवायचीच होती तर काहीतरी दुसरी, चांगली, मुंबईच्या माणसांशी, इतिहासाशी संबंध असलेली तरी ठेवायचीत! सगळीकडे 'राजा शिवाजी' किंवा 'छत्रपती शिवाजी' काय? छत्रपतींचे मुंबईतले कर्तृत्व किंवा छत्रपतींचा मुंबईशी संबंध काय? निदान त्या 'गोवालिया टँक'ला कसे 'ऑगस्ट क्रांती मैदान'सारखे छान आणि समर्पक नाव ठेवलेत, तसे तरी करायचेत. सहार विमानतळाला नाव ठेवायचेच होते, तर मग 'छत्रपती शिवाजी विमानतळा'ऐवजी 'जे. आर. डी. टाटा विमानतळ' म्हटले असतेत तर काय बिघडले असते? निदान जे. आर. डी. मुंबईचे रहिवासी तरी होते आणि त्यांनी पहिली हिंदुस्थानी विमानसेवा आणली आणि तीही मुंबईत!" एवढा एकच सौम्य आक्षेप नोंदवू शकतो आणि इच्छितो.)
पण मग तीच कल्पना शेवटपर्यंत पुढे नेली, तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानीसुद्धा केवळ ब्रिटिश राजवटीच्या वारशामुळेच आहे.
(ब्रिटिशांपूर्वी मुंबईला फारसे महत्त्व नव्हते. इंग्लंडच्या राजाला हुंड्यातून मुंबई मिळाल्यानंतर त्याने ती ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे मुंबई हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि वसाहतीचे ठिकाण बनले. पुढे जसजसा आजूबाजूचा प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीच्या - आणि पर्यायाने इंग्रजांच्या - ताब्यात येत गेला, तसतसा तो मुंबईच्या वसाहतीला जोडला जाऊन त्यातून पुढे मुंबई इलाखा किंवा मुंबई प्रांत बनला, मात्र या प्रांताचे सत्ताकेंद्र - अर्थात कंपनीच्या सोयीसाठी - मुंबई शहरातच राहिले. पुढे १८५७च्या युद्धानंतर या प्रांताचे फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून इंग्लंडच्या राणीकडे - आणि पर्यायाने ब्रिटिश सरकारकडे - हस्तांतरण झाले. मात्र बाकी काहीही फरक पडला नाही. त्यानंतरच्या स्वातंत्रपूर्व इतिहासात सिंध आणि येमेनमधील एडन वसाहत वगैरेंसारखे प्रदेश मुंबई प्रांतापासून वेगळे केले गेले. मात्र उर्वरित मुंबई प्रांत मुंबई शहर या राजधानीसह कायम राहिला. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचनेच्या वेळीसुद्धा या प्रांतात इतर प्रांतांतले मराठीभाषिक प्रदेश जोडले गेले तर या प्रांतातले कन्नडभाषिक प्रदेश वेगळे केले गेले, परंतु त्यानंतरसुद्धा हा प्रांत 'मुंबई द्वैभाषिक राज्य' म्हणून - मुंबई शहर या राजधानीसह - कायम राहिला. नंतर या 'मुंबई द्वैभाषिक राज्या'चे विभाजन होऊन जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये बनली, तेव्हा भौगोलिकदृष्ट्या मुंबई शहर हे ज्या महाराष्ट्र राज्यात होते त्याच राज्यात त्या राज्याची राजधानी म्हणून कायम राहिले.
इतिहासाच्या तपशिलांत जर काही बारीकसारीक त्रुटी असतील तर चूभूद्याघ्या, पण थोडक्यात, मुंबई शहर हे भौगोलिकदृष्ट्या ज्या प्रांतात अंतर्भूत होते त्या प्रांताची राजधानी म्हणून त्याचा दर्जा किंवा त्याचे स्थान हे सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या सोयीने ईस्ट इंडिया कंपनीच्या - म्हणजे ब्रिटिशांच्या - कारकीर्दीत ठरवले गेले आहे. आणि त्यानंतर त्या प्रांताच्या विविध हस्तांतरणातून आणि स्थित्यंतरांतून वारसाहक्काने हा दर्जा किंवा हे स्थान कायम राहिलेले आहे.
किंवा, दुसऱ्या शब्दांत, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी केवळ ब्रिटिश राजवटीच्या वारशामुळे आहे. )
ब्रिटिश राजवटीच्या वारशाच्या खुणा पुसून टाकण्यासाठी मुंबईतील जागांची अधिकृत नावे आणि खुद्द मुंबईचे अधिकृत नाव जर बदलले जाऊ शकते, तर मग त्याच कारणाकरिता महाराष्ट्राची राजधानी ही मुंबईवरून हलवून (मात्र मुंबई शहर हे तरीही महाराष्ट्रातच ठेवून) जालना, बुलढाणा अथवा अहमदनगरसारख्या एखाद्या (तुलनेने छोट्या, महानगर नसलेल्या, तुलनेने कमी विकसित आणि कमी महत्त्व किंवा कमी 'ग्लॅमर' असलेल्या) ठिकाणी हलवण्यास काहीच हरकत नसावी. मुंबईच्याच विकासाकडे लक्ष केंद्रित झाल्यामुळे बाकीच्या महाराष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असण्याची समस्या जर खरोखरच अस्तित्वात असेल, तर त्यायोगे ती समस्या सुटून उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाची वाट आपोआपच मोकळी व्हावी.