मुंबईत रस्त्यांना वगैरे काय नावे दिली गेली अन अमेरिकेतील राजधानीची शहरे ही मोठी शहरेच असतात असे नाही यावर माहिती मिळाली. पण तो मुद्दा नाही.
मुद्दा असा आहे की मुंबईतील मराठी माणसाची अवस्था पाहून सर्वत्र ती अवस्था आहे असे गृहीत धरण्यात येत आहे असे माझे मत आहे.
त्यावर 'टगोबांनी' हे मान्य नाही असे सांगीतले आहे. या मताचा अर्थातच आदर आहे, कारण चर्चेमध्ये विरुद्ध वा बाजूने बोलणे हेच अपेक्षित असणार!
कुणीतरी सांगा....
१) कोल्हापुरात जर वेटर गिऱ्हाईकाला चुकून म्हणालाच की तुम्ही मेन्यू कार्ड आधी वाचा, म्हणजे एकदा दर समजले की काय ऑर्डर द्यायची हे तुम्हाला ठरवता येईल, तर त्या वेटरच्या खानदानाचा उद्धार होणार नाही काय? कुणाच्या अनुभवात एक तरी वेटर असा आहे का ज्याने गिऱ्हाईक फक्त मराठी दिसते आहे म्हणून असा प्रश्न विचारला?
२) मुंबईमध्ये मराठी माणसाची परिस्थिती वाईट आहे याची महत्त्वाची कारणे ही नाहीत काय?
* गुजराती लोकांनी कौशल्याने आपले व्यवसाय उभारले
* उत्तर भारतीयांनी कौशल्याने पानाचे ठेले चालवले
* दक्षिण भारतीयांनी कौशल्याने रेस्टॉरंटस चालवली
हे सगळे होत असताना मुंबईतील मराठी माणूस स्वस्थ बसलेला होता अन आज अचानक त्यावर चित्रपट निघतायत, गाणी केली जातायत?
३) पुण्यात किंवा अन्य शहरात लोड शेडींग आहे तेव्हा मुंबईत ते नाही याचे गुणगान गायले जाण्यात काय अर्थ आहे?
४) चंद्रपूर जिल्ह्यात आमदारांची मीटिंग ठेवलेली असली तर कोरमची संख्या अत्यल्प असते. परभणी, जालना अन कित्येक जिल्हे पॉवर, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. फक्त ते जिल्हे महाराष्ट्राला फारसे उत्पन्न मिळवून देत नाहीत म्हणून सुविधांपासून वंचित राहणे योग्य आहे काय?
५) अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारतभेटीत चंद्राबाबूंनी भांडून २६ मिनिटे वेळ मिळवला व संपूर्ण आंध्रची परिस्थिती प्रेझेंट केली. त्यातून अनेक वित्तीय मदती मिळवल्या. आपल्याकडे त्यांना मुंबईत ४ मिनिटात फक्त मुंबईचे प्रॉब्लेम्स सांगीतले गेले. जास्त वेळ मिळावा म्हणून कुणी प्रयत्नही केले नाहीत. त्याचवेळेस शेतकरी बिचारे मरत होते. हे योग्य आहे काय?