मला वाटतं बातमीचं शीर्षक लिहीताना (कदाचित जागा वापरण्याच्या मर्यादेमुळे) "चुकीची मराठी भाषा स्वीकारू नये" असं न लिहील्याने वेगवेगळ्या प्रकारे "मराठी"चे संदर्भ लावू शकण्याची अनावश्यक शक्यता निर्माण केली आहे.

"मराठी भाषा" असा शब्दप्रयोग केल्यास त्याचं विशेषण हे निःशंक स्त्रीलिंगी वापरावे लागेल. मात्र "तुझं मराठी बोलणं" म्हणताना (बरोबर की चूक हे बोलणंचं विशेषण झाल्याने तेथे "चुकीचं" हा वापर योग्य ठरेल.  कीस पाडायचाच झाला तर "व्रुत्तपत्रांनी चुकीची मराठी" व "दूरदर्शन अथवा आकाशवाणीने चुकीचं मराठी" स्वीकारू नये हे योग्य ठरेल, कारण वर्तमानपत्रातून आपण मराठी (भाषा) वाचतो तर बाकी दोन माध्यमांतून ऐकण्याची क्रिया प्रामुख्याने करतो, म्हणून त्या-त्या संदर्भात "चुकीची" किंवा "चुकीचं" बरोबर ठरू शकेल.

या शीर्षकात मात्र "प्रसारमाध्यमांनी" असा सर्वसमावेशी शब्दप्रयोग केल्याने प्रत्येकाला आपण बरोबर व दुसरा चूक ही म्हणायची मुभा वार्ताहर / संपादकांनी दिली आहे इतकेच म्हणता येईल.

मूळ बातमी इतकेच माझे उत्तर लांब झाले आहे याबद्दल क्षमस्व, परंतु एखादा मुद्दा स्वतःचे (तरी)  समाधान होईल असा मांडायचा म्हणजे थोडा विस्ताराने मांडणे अटळ आहे.