व्यवसाय कोणताही असो एकच गुण हवा आणि तो म्हणजे साहस!  जो आहे ते जपतो त्याला नोकरी करावी लागते आणि जो आहे ते पणाला लावायची तयारी दाखवतो तो व्यवसाय करतो. यश आणि अपयश हा अनेक घटक एकत्र येऊन झालेला परिणाम असल्यामुळे यशाचा राजमार्ग नाही. यशस्वी लोकांचा इतिहास वाचून कुणीही यशस्वी होत नाही पण धाडस असेल तर कोणीही धंदा करू शकतो. सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिवर्सिटीत परवा मला बोलावले होते. कॉमर्स म्हणजे काय? असा प्रष्ण तिथे चर्चेच्या ओघात आला. अनेक नामवंत फॅकल्टी मेंबर्स होते. मी त्याना म्हणालो इतक्या उहापोहात जाऊ नका. कॉमर्स म्हणजे पैश्यातून पैसा करणे इतकी सोपी व्याख्या आहे. तुम्ही व्यवसाय काय करता हा प्रष्ण नाही तुम्ही धाडस करणार की नाही हा प्रष्ण आहे.

'यशस्वी' ही कल्पना फार वैयक्तिक आहे आणि ती तुलनेवर आधारीत असल्यामुळे निरर्थक आहे.

एकदा पैश्यातून पैसा करणे म्हणजे व्यवसाय हे कळल्यावर खरा यशस्वी तो की जो व्यवसाय करतो पण ज्याला पैसा हलवू शकत नाही, ज्याचे स्वास्थ्य पैसा बिघडवू शकत नाही. 

त्यामुळे व्यवसाय करणे हे पहिल्यांदा दुर्मिळ आणि यशस्विता तर त्याहून दुर्मिळ. पण मी दोन्हीही क्लूज दिले आहेत. प्रयत्न करून बघायला हरकत नाही.                    संजय