पुरंदरचा वाघ सरदार येथे हे वाचायला मिळाले:
रात्रीची बैठक मोडली आणि सारेजण आपापल्या घरी गेले. इकडे बळवंताकडेही सामसूम झाली. अर्थात ते अंथरुणावर पडले होते, तरी कोणाचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. पांडुरंगपंत आणि रुक्मिणीकाकू तळमळत पडले होते. आपल्या लेकराचं काय होईल, याचाच विचार त्यांच्या मनात होता. बरोबरही होतं त्यांचं. पोर जंगलात जातं काय, तिथं हे स्वामी निश्चलानंद भेटतात काय, ते त्याला घेऊन परततात काय आणि एक मासापर्यंत विशेष प्रशिक्षण द्यायचं जाहीर करतात काय… सारं वेगळं वाटत होतं… बरं निश्चलानंदांनी आपली कोणत्याही गोष्टीत परवानगी विचारलीच नाही, याचं नाही म्हटलं तरी शल्य वाटतंच होतं. दोघंही बराच वेळ बोलत बसली होती. वेगवेगळ्या बाजूनं विचार करून झाला; पण सगळे मार्ग निश्चलानंदांपर्यंत येऊन थांबत होते. निश्चलानंदांचं एकूण व्यक्तिमत्त्व, त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारं तेज आणि त्यांच्या संगतीत केवळ एक आठवडा राहिल्यानंतर बळवंतामध्ये झालेला बदल… त्यांनी वर्तविलेलं बळवंताचं भविष्य या साऱ्यामुळे वेगळंच गूढ असं वातावरण निर्माण झालं होतं. निश्चलानंदांच्या संभाषणानंतर जमलेल्या गावकऱ्यांनी त्यांच्यानंतर बळवंतालाही केलेला नमस्कार त्यांनी पाहिला होता… बऱ्याच चर्चेनंतर जे होईल, ते होऊ द्यावं, तीच शंभोची इच्छा दिसते, अशा निष्कर्ष काढून त्यांचं संभाषण संपलं. अर्थात संभाषण संपलं, तरी थोडीफार धाकधूक होतीच… ती जशी या दोघांच्या मनात होती, तशीच अनेक गावकऱ्यांच्या मनातही होती. या दोघांचं जसं संभाषण सुरू होतं, तसंच ते गावातील अनेक घरातही सुरू होतं. शेवटी सगळ्यांनीच आपल्या मनाचा भार शंभू महादेवावर टाकला आणि डोळे मिटले…
...
पुढे वाचा. : फँटास्टिक स्टोरी भाग ९ : बळवंता ते बळवंतराव