मी स्वतः असे मानतो की जर का मराठी भाषक सध्या जी लिपी, देवनागरी म्हणून वापरतात, त्यात काही सुधारणा केल्या तर मराठी भाषकांचे नशीब बदलू शकते.
मराठी लिपीत सुधारणा करायची तर संस्कृत, अर्धमागधी, पाली, नेपाळी, हिंदी, कोंकणीतही करायला पाहिजे. फक्त मराठीत सुधारणा करणे हे कोतेपणाचे लक्षण आहे. इंग्रजी ज्या रोमन लिपीत लिहितात, तिच्यात अनेक दोष आहेत. म्हणून ती लिपी सुधारावी असा देशद्रोही विचार कोणी इंग्लिशमन कधी करेल? लिपी ही आपली संस्कृती असते, तिच्यात कोणताही मूलगामी बदल करण्याचा विचारसुद्धा मनात आणणे हा संस्कृतीद्रोह आहे. असे करण्यात कुणी यशस्वी झालाच तर खरोखरच मराठी भाषकांचे नशीब बदलू शकते, म्हणजे परिणती, सध्याच्या सौभाग्याकडून उद्याच्या घोर दुर्भाग्याकडे!
संस्कृतमध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत असे तीन प्रकारचे कालमापक उच्चार आहेत. यांतल्या प्रत्येकाचे अनुनासिक, अननुनासिक, असे दोन प्रकार होतात. या सर्वांचे तोंडाच्या कुठल्या भागातून उच्चार यावर आधारलेले उदात्त(ऍक्यूट), अनुदात्त(ग्रेव्ह), स्वरित(सर्कमफ़्लेक्स) असे आणखी तीन प्रकार होतात. म्हणजे अ, इ, उ या स्वरांचे प्रत्येकी ३*२*३=१८ उच्चार होतात.(बाकीच्या स्वरांचे प्रत्येकी १२ होतात). हे सर्व उच्चार दाखवणारी चिन्हे वापरात आहेत. कुठे ही उच्चाराची शास्त्रशुद्धता आणि कुठे ऱ्हस्व-दीर्घ काढून टाका असे सुचवणारे क्षुद्र विचार! इंग्रजीतून ऱ्हस्वदीर्घ काढून टाका असे कुणी सांगितले तर त्याला फुल फ़ूल म्हणतील. इंग्रजी शब्दकोश कॉट्(cot) व कॉऽट्(caught) असले सूक्ष्म उच्चारभेद दाखवतात आणि आम्ही इ-ई आणि उ-ऊ हे उच्चार सपाट करायला निघालो आहोत.
मल्याळी लोकांचा अनुभव विचारात घ्या. त्यांनी लिपीसुधारणा करून पाहिली आणि आता मल्याळी तरुणांना जुनी लिपीही येत नाही आणि नवीही. त्यांनी त्यांच्या मातृभाषेचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. --अद्वैतुल्लाखान
(काही भाग संपादित. : प्रशासक)