संपला रस्ता तरी चालायचे सोडू नको
पायवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको
चांगल मतला आहे. स्फुर्तीदायक मनस्थिती जाणवते. स्फुर्ती स्वतः साठी किंवा दुसऱ्यासाठी! पहिल्या ओळीमध्ये 'रस्ता संपला तरी' या ओळीतून 'रस्ता संपला आहे, आता काटेकुटे किंवा डेड एंड येणार' ही अपेक्षा मनात येते. अशा वेळेस 'पायवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको' ही ओळ एकंदर मुद्याला अगदीच साधासुधा करून टाकते. म्हणजे, 'रस्ता संपला तरीही पायवाट असेल, त्यावरून जात राहा' हा विचार माणसाने ध्येयाच्या बाबतीत चिवट असावे, पेशन्स ठेवावा, त्रास झाला तरी चालेल पण कर्तव्य पार पाड असे सल्ले देतो. दोन्ही ओळीत साधारण तेच सांगायचे असल्यास एका ओळीत प्रतिमा वापरणे शेराला उठावदार करत असावे. तसेच, 'पायवाटेने' या शब्दामध्ये शेरातील भावनेची तीव्रता सामावण्याचा प्रयत्न झाला आहे. पण पायवाट ही अगदीच त्रासदायक असते असे नाही. काही वेळा मऊ मातीवर चालणे सुखदायकही असू शकते. भावनेची तीव्रता अधिक उंची गाठणारी हवी अशी एक अपेक्षा मनात आली.
मी तुला नक्की कधी भेटेन हे सांगू कसे?
एवढे सांगेन की शोधायचे सोडू नको
कुणीतरी असे विचारले आहे की 'नक्की कधी' ऐवजी 'नक्की कुठे' कसे वाटेल? माझ्यामते दोन्ही शब्दसमुहांना जरी योग्य अर्थ असला तरी 'नक्की कधी' मध्ये एक अनप्रेडिक्टॅबिलिटी आहे. म्हणजे 'भेटेनेच की नाही' हेही माहीत नाही, अशी! ती जास्त तीव्र व भिडणारी वाटावी. अतिशय सुंदर शेर! हा संवाद प्रेयसीशी, स्वतः शी दोन्ही अर्थाने उत्तम आहे. हा संवाद ईश्वराशी आहे असे गृहीत धरले तर एक वेगळीच बेफिकिरी अन नशा जाणवावी. म्हणजे, मी काही तुला शोधत वगैरे नाहीये, तूच मला शोधत बस, अशी! उत्तम शेर! तसेच, 'सांगू कसे' यात एक बेहोशी आहे. मलाच माहीत नाही मी कुठे आहे, कधी भेटेन, तुला काय सांगणार? व्वा! अन त्यातही तिने / त्याने / स्वतःने शोधायचे मात्र थांबवू नये अशी एक भौतिक उर्मी पण आहे. श्रेष्ठ शेर!
कवडसे पडतील आपोआप माझ्या अंगणी
फक्त गच्चीवर सकाळी यायचे सोडू नको
सपाट शेर! यात कवीच्या अंगणामध्ये काय केले की कवडसे पडतील अशी प्रेयसीला चिंता असावी असे काहीतरी निघत आहे. त्याची कवीला चिंता कमी अन प्रेयसीला जास्त असे काहीतरी! असा भाव असता... 'ती तर काही माझी होऊ शकत नाही, फक्त तिने गच्चीवर येणे सोडू नये, निदान माझ्या अंगणात त्यामुळे कवडसे तरी पडतात, अन मला मानसिक आधार मिळतो' तर एक व्यथा जाणवेल!
काय झाले जर सभोती मोर दिसती शेकडो
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको
व्वा! सुंदर शेर! हा शेर फारच छान आहे. कुणालाही कुठल्याही परिस्थितीमध्ये लागू होऊ शकेल असा. गझलेमध्ये सार्वकालीन लागू होणारे शेर असले की मजा येते. ( विनोद - मला या द्विपदीवरून 'अमिताभ बच्चन' या कवितेची आठवण झाली. राईट स्पिरिटमध्ये घ्यावेत. )
पाहिजे तर फेक गेलेल्या क्षणांची लक्तरे
पण नव्याने सूत तू जमवायचे सोडू नको
पण नव्याने सूत तू जमवायचे सोडू नको. उत्तम ओळ! या ओळीच्या हळुवारपणाला फाडणारी शब्दरचना पहिल्या ओळीत आहे. त्यात 'फेक', 'लक्तरे' असे शब्द आले आहेत. ही अर्थातच कवीचीच निवड! त्याने तीव्रता वाढत आहे हे मान्य! पण हिंसाही येत आहे असे वाटते. ( काय राव, ती तर माझी खासियत आहे! ) एक अत्यंत काव्यमय अशी ओळ आहे, दुसरी! 'सूत जमवणे' यात एक नात्यातील अतिशय सुंदर अर्धवटपणा आहे. पती-पत्नींना एकमेकांशी सूत जमवावे लागत नाही. ते जमलेलेच असते. 'सूत जमवावे लागते' ते अशा नात्यात जिथे कदाचित एकाला दुसरा फारसा नको आहे पण असला तरी चालेल अन दुसऱ्याला मात्र पहिला खूप हवा आहे. यात एक प्रायोगिकता येते. 'बघू पुन्हा एकदा प्रयत्न करून, या सूत जमवण्यातून सशक्त नाते निर्माण होते का ते पाहू' अशा अर्थाची! व्वा! 'पाहिजे तर मी हवा आहे तसा भासेनही' अशी पहिली ओळ मला सुचली. अर्थात हे व्यक्तिगत आहे हे मला मान्य आहेच. माफ करावेत. उत्तम शेर आहे.
तू न माझा तू नभाचा; मान्य हे आहे मला
बरस थोडेसेच पण झिरपायचे सोडू नको
तू न माझा... तू नभाचा हा शब्दप्रयोग छान आहे. 'तू माझा नसणे व नभाचा असणे' याचा 'थोडेसेच बरसणे पण झिरपावा अशी मात्र इच्छा असणे' याच्याशी संबध समजला नाही. कवीने स्वतः सांगावा अशी इच्छा!
धन्यवाद!