कथा वाचल्यावर उद्भवलेल्या काही शंका आणि काही निरीक्षणे मांडावीशी वाटतात. ती पुढीलप्रमाणे.
- डीसूजासाहेबांचे पाळण्यातले नाव काय? की बारशाच्या वेळी कानात 'कुर्रर्रर्रर्र' करताना डीसूजासाहेबांच्या मातुःश्री त्यांच्या कानात 'डीसूजा' असेच पुटपुटल्या होत्या?
- मेरीबाईंच्या आडनावाचा कोठेही स्पष्ट उल्लेख नाही. कथानकावरून त्या डीसूजासाहेबांच्या हयातीत त्यांच्या धर्मपत्नी असाव्यात असे वाटते, त्यावरून त्यांचे आडनाव 'डीसूजा'च असावे असा अंदाज बांधण्यावाचून वाचकास पर्याय उरत नाही.
- एकंदरीत कथेच्या अथवा चित्रपटाच्या कथानकात ख्रिस्ती पुरुषपात्राचा उल्लेख त्याच्या आडनावाने तर ख्रिस्ती स्त्रीपात्राचा उल्लेख तिच्या पाळण्यातल्या नावाने करण्याचा प्रघात असावा, असे वाटते.
- 'दामले' ही व्यक्ती डॉक्टर आहे असे कळते. सहसा डॉक्टर वगैरे मंडळींचा उल्लेख उपाधीसह आणि आदरार्थी करावा असा प्रघात आहे, असे वाटते. अर्थात या कथेतील दामले ही व्यक्ती डॉक्टर जरी असली तरी खलनायक आहे, आणि अशा परिस्थितीत प्रघातानुसार नुसता (उप)नामोल्लेख आणि एकवचन दोन्ही चालू शकतात, असे वाटते.
- मात्र, ख्रिस्ती व्यक्तीच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत आदरार्थी उल्लेख हा प्रघातानुसार आवश्यक नसावा, किंबहुना वर्ज्य असावा, असे वाटते.
- दैनंदिनी नष्ट केल्यानंतर समाजाच्या लेखी अपकृत्याचा पुरावा नष्ट होतो, एवढेच नव्हे, तर त्यानंतर लगेचच डीसूजा*-दामले शुभविवाह हा समाजमान्य होतो, आणि त्याची कोठेही साधकबाधक चर्चा होत नाही, इतकी आपल्या समाजाची प्रगती पाहून गहिवरून आले.
*किंवा मेरीचे जे काही विवाहपूर्व उपनाम असेल ते.
एकंदरीत कथा पठडीतली, छापातली** वाटली. असो.
**या वाक्यात 'पठडीतली', 'छापातली' यांऐवजी 'साचेबद्ध' हा (बऱ्यापैकी) समानार्थी शब्द वापरला असता, तर प्रतिक्रिया अकारण सकारात्मक वाटली असती असे वाटते. का ते कळत नाही.
(जाता जाता: डीसूजासाहेबांना जर पाळण्यातले नाव ठेवायचेच झाले, तर प्रघाताप्रमाणे ते 'जॉन' असे असावे काय? तसे मेरीबाईंचे 'मेरी' हे पाळण्यातले नाव हे प्रघातास धरूनच आहे.)