कवितेत प्रकर्षाने जाणवतो तो गंड. complex. (न्यून की अंहं ते रसिकांनी ठरवावे. )
कवितेत एक प्रसंग वर्णन केला आहे. एक मराठी गझलकार मरण पावला आहे. त्या अनुषंगाने झालेल्या घडामोडी आणि सरतेशेवटी मराठी गझलेचे दुखणे काय ते मांडले आहे.
पाहूया.
चिता पेटता धुराऐवजी अहंकार निघतो
मेलेला माणूस मराठी गजलकार निघतो
इथे मराठी गझलकारावर एक जळजळीत टीप्पणी केली आहे. काय, तर म्हणे मराठी गझलकाराला अहंकार असतो. आणि अहंकार तरी किती? की तो मरण पावल्यावर सुद्धा त्याच्या चितेतून धुराऐवजी अहंकारच बाहेर पडतो! आहे की नाही गंमत !!
आता मुळात मराठी भाषेत गझलकार ते किती? त्यात आंतरजालावर लिहिणारे किती? त्यात "अहंकारी" किती असतील? आणि हे कवीला कसे कळले असावे वगैरे मुद्दे इथे गैरलागू आहेत. कारण हा शेर नसून ही नुसती पिंक आहे, मताची.
मात्र यावरून कळावे की या टीचभर सुद्धा नसलेल्या मराठी गझल"विश्वात" सुद्धा सगळे काही आलबेल नाही.
स्पर्धक निघती बघायास पत्ता कटलेल्याला
पोटासाठी अर्ध्या रात्री पत्रकार निघतो
इथे फक्त वरची ओळ सांगायची होती. खालच्या ओळीचे यमक साधण्याशिवाय प्रयोजन दिसत नाही. (किंवा एक उप-पिंक टाकायची असावी की यांच्या मयतीला येणारे पत्रकारसुद्धा काही मनापासून येत नाहीत, तर पोटासाठी येतात, वगैरे.)
कुटुंबियांना मदत हवी का विचारती सारे
अस्थीविसर्जनाला जाण्याला नकार निघतो..
आता सगळेच गझलकार 'अहंकारी' असले तरी जमलेल्यांपैकी काहींना उपचार म्हणून तरी कुटुंबीयांची विचारपूस करणे आले. त्याप्रमाणे ते करतात. पण अस्थिविसर्जनाला जाण्यास नकार देतात. बरं मग? इतर अहंकारी आले नाहीत तर मयत अहंकाऱ्याचे अस्थिविसर्जन राहून जाते की काय? कुटुंबियांची विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाने अस्थी विसर्जीत करायला गेलेच पाहिजे का? आणि मयत अहंकाऱ्याची हाडे बुडवून आले म्हणजे हयात अहंकारी हे अहंकारी नाहीत, असे काही सिद्ध होते का?
कै च्या कै शेर आहे हा.
आठवड्याने सभेत सारे भाषणही देती
एक शब्द ना खरा सभेमध्ये चकार निघतो
आता थोड्याफार फरकाने हा प्रकार भारतातल्या प्रत्येक सभेत घडतो. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचे नाही, ही आपली संस्कृती आहे. त्यात "मराठी" ,"गझलकार", "अहंकारी" इत्यादी स्पेसिफिकेशन्स निरर्थक आहेत.
वादावादी होते अर्जुन ठरण्याला अंती
गेला तो एकलव्य म्हणण्याचा प्रकार निघतो
अशा सभेत अचानक मयत गझलकार 'एकलव्य' असल्याचा ठराव पास होतो. आता तो एकलव्य, तर अर्जुन कोण यावरून इतरांमध्ये वादावादी चालू होते. हा प्रकार काही आम्हाला समजला नाही. एकलव्याचा वारस अर्जुन आहे असा काही संदर्भ आमच्या वाचनात आलेला नाही.
गजल बिचारी अश्रू ढाळत एकाकी होते
भुरळ पाडतो जो आधी तो तो भिकार निघतो
हुश्श.
सगळा डोंगर पोखरून झाल्यावर आता कुठे का एवढासा उंदीर सापडतो आहे. गझलेचे दुःख काय हे कवी आपल्याला सांगतो आहे. ते म्हणजे, जो कुणी कवी आधी भुरळ पाडतो (म्हणजे चांगल्या गझल रचतो, असा आम्हाला लागलेला अर्थ) तो नंतर भिकार निघतो.
असा निष्कर्ष काढायला कवीने निश्चित अर्वाचीन गझलकार, त्यांची उत्पत्ती, वाटचाल, विलय यासंबंधी काहीतरी अभ्यास केलेला असणार. मग तो अभ्यास वाचकांसमोर मांडायचा तर एक चांगला लेख तयार केला असता. कारण हा काही काव्यविषय नाही. (गझलविषय तर नाहीच नाही.)त्यामुळे एका मराठी गझलकाराला मारणे, त्याची अंत्ययात्रा, शोकसभा वगैरे सोपस्कार करण्यात कवीचा आणि प्रतिसाद देण्यात आमचा वेळ वाया गेला नसता.
आणि आमच्यामते तर हा निष्कर्षही साफ चुकीचा आहे. मराठीत चांगले गझलकार आहेत, नवे तयार होत आहेत. गझलेने अश्रू ढाळावे इतकी वाईट परिस्थिती आम्हाला तरी दिसत नाही.
...आणि कवीला दिसत असल्यास त्याने उत्तमोत्तम गझला करून हे अश्रू पुसण्यात हातभार लावावा. उगाच अशा रचना करून मराठी गझलेला अधिक रडवेले करू नये.. ही नम्र विनंती.
आपला-
(नुकताच कुठला कवी मरण पावलाय का, याच्या शोधात असणारा)
शाहिस्तेखान.