... महाराष्ट्रात घुसून स्थानिक प्रशासनाची भाषा मराठीसोबत हिंदी व्हावी यासाठी प्रयत्न करू शकतात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू शकतात.

महाराष्ट्राची लेकरे उत्तरप्रदेशात, मध्यप्रदेशात, बिहारात, दिल्लीत मोठ्या प्रमाणात घुसून स्थानिक प्रशासनाची भाषा मराठी व्हावी म्हणून का प्रयत्न करू शकत नाहीत? उ. प्र., म. प्र., बिहार, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची, झालेच तर भारताच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने का बरे पाहू शकत नाहीत? (यात कायद्याची काहीच अडचण नसावी; "मावशीच्या मुलां"ना जो कायदा लागू आहे तोच भारताचा नागरिक म्हणून मराठी माणसालाही लागू आहे - तेवढे जम्मू आणि कश्मीर वगळल्यास. )

त्यासाठी महत्त्वाकांक्षा लागते. बाहेर, इतर राज्यांतच नव्हे तर इतर देशांतही जाऊन स्वतःला प्रस्थापित करण्याची नुसती धमकच नव्हे, तर मुळात इच्छा लागते. आणि हो, त्यासाठी आधी घराबाहेर पडावे लागते.

हिंदीचा यात दोषही नाही आणि संबंधही नाही.

गंमत म्हणजे, मुंबईत मराठी मुंबईकराची अस्मिता जागवणाऱ्या बाळासाहेब ठाकऱ्यांच्या घराण्याचा गेल्या दोन पिढ्यांचा इतिहास पाहिला तर तेही मूळचे / जन्माने मुंबईकर नव्हेत. तेही पोटापाण्यानिमित्त बाहेरून महाराष्ट्रात / मुंबईला आलेले. बाळासाहेबांचा जन्म पुण्यातला, आणि त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे तर म. प्र. तून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले. म्हणजे आमची अस्मिता जागवण्यासाठीसुद्धा आम्हाला जेथे बाहेरून आलेले (मराठीभाषक असले तरी) लागतात, तेथे परप्रांतीयांना / हिंदीभाषकांना दोष कोणत्या आधारावर द्यायचा?