जीवन हे चित्राच्या ब्लँक कॅन्व्हास सारखं आहे. बिचारं आगदी साधं आहे. प्रत्येकाला त्याची मजा तो आपल्याला मिळालेल्या जीवनात कसे रंग भरतो आणि त्याला त्या विषयी किती कृतज्ञता आहे यावर आहे.
तुम्ही संगीत शिकलाच नाहीत तर एक रंग हुकला, तुम्ही तुमच्या पत्नीत तुमची प्रिया शोधली नाही तर आणखी एक रंग चुकला, तुम्ही एखादा खेळ आत्मसात केला नाहीत तर तुम्ही या जीवनाला खेळ का म्हंटल आहे हे कसं जाणणार, तुम्ही शून्य शोधलं नाही तर या हरक्षणी बदलणाऱ्या जीवनाच्या शाश्वत बॅकग्राउंड स्कोअरला, ज्या पडद्यावर हा खेळ चिरंतन चालू आहे त्याला मुकलात, तुम्हाला निर्भयता आणि साहस आलं नाही. तुम्हाला या उत्कट क्षणभंगुरतेतली मजाच घेता आली नाही.
जो उत्कटतेनी जगतो त्यालाच उत्कट मृत्यू येतो. ते दिवस आणि रात्री सारखं आहे, ज्यानी दिवस आनंदात घालवला त्याची झोप आनंदाची. ज्यानी शून्य जाणलं त्याला कळतं की आपण मूळात शून्यच आहोत आपल्याला कसला मृत्यु? पण शून्य कळलं तर! निसर्गदत्त महाराज म्हणतात की "सत्य (शून्य) ही अशी चिज आहे की जिथे जाणण्यात आणि होण्यात क्षणाचं ही अंतर नाही". शून्य न समजल्यामुळे निराशा आहे. शून्य समजलेल्या प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगळी असेल पण निराशा? 'एखाद्या विलक्षण अनुभवानंतर पुन्हा सर्वसामान्य आयुष्य का जगावे वाटेल?' निरंजन आयुष्य नेहमी सामन्य आहे. ज्याला शून्य कळलं त्याला त्याची खऱी मजा आहे. आयुष्य नाकारणाऱ्याला नाही. याचा खूप विचार कर. ही चर्चा अमक्याला सत्य गवसलं होतं का? तमक्याचं काय झालं अशी नेऊ नकोस. सत्य हे एकाच वेळी सार्वत्रिक आणि तरीही अतिशय लोभसपणे वैयक्तिक रहस्य आहे. मला स्वतः ला ते शोधायला वीस वर्ष लागली आहेत. संजय