आम्हाला हिंदी छान येते हो
हे विधान सरसकट मराठी लोकांना लागू होत नाही. अपवादाने मराठी माणसाचे हिंदी चांगले असेलही ( तसे मराठी माणसाचे मराठीही अपवादानेच चांगले असते! ) पण एकंदर महाराष्ट्रात हिंदीच्या नावाने आनंदच आहे.

अगदी! आणि हेच बऱ्याच अंशी मराठीभाषकाच्या इंग्रजीलासुद्धा लागू आहे.

कधीकाळी महाराष्ट्रात आलो आणि (मी मराठीभाषक असूनसुद्धा आणि मला मराठी अगदी छान लिहितावाचताबोलतासमजता येत असूनसुद्धा) कोणी मराठीभाषक जर माझ्याशी इंग्रजीत (किंवा हिंदीत) बोलू लागला (किंवा लागली), तर मी शक्यतोवर संभाषण मराठीकडेच वळवण्याचा प्रयत्न करतो. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाशी मराठीव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत बोलण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. तसे करण्यास माझी सहसा काही हरकतही नसते. किंबहुना माझ्याच तोंडून बऱ्याचदा इंग्रजीतून (किंवा क्वचित हिंदीतून) संभाषणास सुरुवात होण्याचीही शक्यता असते. मात्र बऱ्याचदा समोरच्याचे इंग्रजी (किंवा हिंदी) ऐकून "त्यापेक्षा आपण छान मराठीत बोलू - मला उत्तम मराठी येते - पण तुझे इंग्रजी (किंवा हिंदी) आवर" असे म्हणण्याची पाळी येते. शिवाय अमेरिकेतून आलेल्या माणसाशी इंग्रजीतच (किंवा कधीकाळी काही काळ हिंदी मुलुखात राहिलेल्यावावरलेल्या माणसाशी हिंदीतच) बोलले पाहिजे, त्याला मराठी समजणार नाही - मग तो माणूस पुणे ४११०३०मध्ये वाढलेला असला तरी - असे लोकांना का वाटते हे एक कोडेच आहे.

बाकी इंग्रजी काय किंवा हिंदी काय किंवा इतर भाषा काय, चांगली आली पाहिजे या विधानाशी सहमत. इंग्रजी आणि हिंदी व्यवहारात उपयोगी पडतात म्हणून आल्याच पाहिजेत, पण इतर भाषासुद्धा आत्मसात करता आल्या तर चांगल्याच. त्याने तोटा तर निश्चित होत नाही, आणि झाला तर फायदाच होतो.

आणि मराठी मुलुखात राहूनसुद्धा मराठी चांगली न येणाऱ्या मराठीभाषकास* (मराठी ही आपली मातृभाषा मानणाऱ्यास) इतरांनी आपली भाषा आत्मसात केलीच पाहिजे असा अट्टाहास धरण्याचा अधिकार कितपत आहे याबद्दल साशंक आहे.

* 'तसे मराठी माणसाचे मराठीही अपवादानेच चांगले असते!' हे विधान पटते. अर्थात हे योग्य की अयोग्य या वादात पडू इच्छीत नाही. मराठी पालक असलेल्या परंतु मराठी मुलुखाबाहेर वाढलेल्या मुलांचे मराठी - मुळात मराठी आले तर - बऱ्याचदा चांगले नसू शकते. तसेच पालकांपैकी एकजण मराठीभाषक नसल्यास (आणि त्यामुळे घरात मराठीव्यतिरिक्त इतर भाषाही बोलली जात असल्यास किंवा मराठी फारसे बोलले जात नसल्यास) एक पालक मराठी असूनसुद्धा असे होऊ शकते. प्रथमभाषा आत्मसात करण्याच्या वयात एका भाषेचा प्रभाव दुसऱ्या भाषेपेक्षा खूपच अधिक पडण्याची शक्यता निर्माण झाल्यास असे होणे अगदी साहजिक आहे आणि समजण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत मराठी ही अशा मुलाची तांत्रिकदृष्ट्या 'मातृभाषा' म्हणून ती अशा मुलास येईल / उत्तमरीत्या येईल / तशी ती आलीच पाहिजे असा माझा दावा किंवा आग्रह नाही. कदाचित अशा मुलांची मातृभाषा मराठी आहे असे मी मानणार नाही; कदाचित अशी मुलेही तसे मानणार नाहीत. त्यात मला काहीही गैर वाटत नाही. मराठी मुलुखात मराठी घरात वाढलेल्या आणि दोन्ही पालक मराठी असलेल्या मुलांच्या बाबतीतसुद्धा अशा मुलांना मराठी चांगले न आल्यास "तो त्यांचा प्रश्न आहे; त्याने झाले तर नुकसान त्यांचेच होईल" असे म्हणून आणि न्यायाधीशाची भूमिका न घेता मी ते प्रकरण तेवढ्यावर सोडू शकतो. परंतु अशा लोकांनी 'इतरांनी आपली मातृभाषा आत्मसात केलीच पाहिजे' अशी भूमिका घेणे कितपत न्याय्य आहे हे कळत नाही.

बाकी इतर प्रांतांतून महाराष्ट्रात येणाऱ्या अथवा मराठीव्यतिरिक्त इतर मातृभाषा असणाऱ्या परंतु मराठी भाषा उत्कृष्टरीत्या आत्मसात करणाऱ्या अमराठीभाषकांची (वैयक्तिक ओळखीतली तसेच सार्वजनिक) उदाहरणेही पाहिलेली आहेत. (इतक्या उत्कृष्टरीत्या की अगोदर कल्पना नसल्यास आणि डोळे मिटून बोलणे ऐकल्यास ही व्यक्ती मुळात मराठीभाषक नसावी हे कळू नये. )