पुणे असो की मुंबई - आणि आता सोलापूर, नांदेड व औरंगाबाद, नागपूर देखील- अ-मराठी बरेच येऊ लागलेत. अशावेळी आमची मानसिकता बनते आहे की समोर दिसणारा माणूस मराठी नसणारच! अन मग त्यातून असे प्रसंग घडतात. आम्ही रस्त्यावर गेलो की हिंदीतूनच बोलू लागतो. मग उपाहारगृहातील कर्मचारी असो की रिक्षावाला!
मुंबईत मोठ्या प्रमाणात बाहेरून अमराठी लोक येण्याचा प्रकार हा तसा थोडा अलीकडचा असावा. (अर्थात मुंबईत पहिल्यापासूनच अमराठीभाषकांचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर शहरांच्या मानाने खूपच जास्त आहे हा भाग वेगळा. परंतु तरीही मुंबईत मराठीभाषकांचा गट हा पहिल्यापासून सर्वात मोठा भाषिक गट - संख्येने पन्नास टक्क्यांहून कमी झाला तरी - राहिला आहे असे वाटते. अलीकडे हे चित्र बदलले असल्यास कल्पना नाही.)
मात्र मुंबईत मी जे माझ्या कळत्या वयापासून (म्हणजे किमान गेल्या पस्तीसचाळीस वर्षांपासून) पाहिले आहे त्यावरून मुंबईत पुढील प्रकारच्या लोकांशी वापरण्याची भाषा ही प्रघाताने सहसा हिंदीच राहिली आहे.
१. टॅक्सीवाले. (मुंबईतील बहुतांश टॅक्सीवाले हे उत्तरप्रदेशी / शीख / मुसलमान असल्यामुळे हे असू शकेल. )
२. बसकंडक्टर. (मग तो बसकंडक्टर मराठी असला तरी. अर्थात एखाद्या मराठी प्रवाशाने मराठी बसकंडक्टराशी मराठीत बोलले असता उत्तर मराठीत मिळू शकणे अगदीच अशक्य नाही, परंतु अ. बसकंडक्टर आपण होऊन बोलताना सहसा हिंदीतच बोलतात, ब. बसकंडक्टरांच्या घोषणा या हिंदीतच असतात, आणि क. उतारूही बऱ्याचदा बसकंडक्टरला तिकिट मागताना किंवा एरवीसुद्धा प्रघाताने किंवा सवयीने आपली मागणी हिंदीतच करतात असे माझे निरीक्षण आहे. )
असे इतरही गट सापडू शकतील - जसे उपनगरांतील रस्त्यातील चहाची टपरीवाले, गिरगावातील किंवा दादरमधील काही खास मराठी उपाहारगृहे वगळल्यास इतर उपाहारगृहांमधील वेटर, वगैरे - परंतु विस्तृत अनुभवाअभावी त्याबद्दल जास्त लिहू इच्छीत नाही.
तसेच काही खास मराठी उपाहारगृहे वगळता इतर उपाहारगृहांत (जसे उडुपी, पंजाबी किंवा चिनी उपाहारगृहे - मग असे उपाहारगृह हे कलमाडींचे 'पूना कॉफी हाऊस' किंवा मूळचे लिमयांचे (? चूभूद्याघ्या!) 'पूनम' असले तरी) वेटरशी बोलताना किंवा ऑर्डर देताना हिंदीचा बऱ्याचदा प्रघाताने वापर मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रातील इतर शहरांतही पूर्वीपासून पाहत आलेलो आहे. (अपवाद: पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील 'गुडलक' नामक इराणी उपाहारगृहातील भोजनालयविभागातील वेटर हा मराठमोळा असल्यामुळे त्यास नेहमी मराठीतूनच ऑर्डर दिली असतासुद्धा इष्ट खाद्यवस्तू मिळालेली आहे.)
तसेच 'चॅलेंज' हा पत्त्यांचा खेळ खेळताना प्रत्येक बोली ही हिंदीत (किंवा धेडगुजरी हिंदी-मराठीत) बोलण्याचा प्रघात मला वाटते महाराष्ट्रभर - तोही पूर्वापार - असावा.
या सर्वांचा मुंबईत - किंवा उर्वरित महाराष्ट्रातील शहरांत - अमराठी लोक मोठ्या संख्येने येऊ घातले असण्याशी मला वाटते काहीही संबंध नसावा.
(अवांतर: मुंबईतून जर हिंदी हटवली तर 'बंबैया हिंदी' या खास मुंबईच्या प्रकाराचे काय होईल हा चिंता करण्यासारखा मुद्दा आहे. 'बंबैया हिंदी' हा खऱ्या अर्थाने मुंबईकराचा हिंदीवर आणि बिहारी-भय्यादी हिंदीभाषकांवर सूड आहे. त्याचे असे उच्चाटन होता कामा नये. किंबहुना 'बंबैया हिंदी'ला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देऊन आणि वेळ पडल्यास आरक्षणानेसुद्धा तिचे रक्षण केले पाहिजे.)