किंवा कॉमन भाषेची, सर्वांना समजणाऱ्या एकाच भाषेची गरज आहे कारण,

भारत हा मुळातच अनेक भाषा बोलणाऱ्यांचा देश आहे. त्यामुळे सर्वांना कळेल अशी एक भाषा अस्तित्त्वात असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारी कामकाजासाठी पहिल्यापासूनच हिंदीचा वापर आहे. स्वातंत्र्यपूर्व कालापासून हिंदी सर्वसमावेशक भाषा म्हणून वापरात आहे, त्यामुळे तिलाच राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला आहे.

आपण दोन मुद्द्यांची सरमिसळ केली आहे असे वाटते.

मुद्दा १) राष्ट्रभाषा, मातृभाषा आणि कामकाजाची भाषा अशा तीन भाषा वापरल्या जाव्यात का?

तीन वेगळ्या भाषा असण्याला पर्याय नाही कारण,

अ) आपल्या प्रत्येक राज्याची बोली भाषा वेगळी आहे.

ब) नोकरदार वर्गाला (ऑफिस वर्कर्स) इंग्रजी येत असली आणि ती गरजेची असली तरी कामगार वर्गाचे (विक्रेते, रोजंदारी कामगार इ. इ. चा गट ) त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना कॉमन भाषा असणे गरजेचे आहे.

ब चा उप मुद्दा) मराठी भाषिकांबाबत किंवा महाराष्ट्राबाबत मराठी आणि इंग्रजी ह्या भाषा असणे शक्य आहे पण आपल्याला कामानिमित दुसऱ्या राज्यात जावे लागले किंवा उलटे, तर आपण प्रत्येक वेळी इंग्रजी बोलून चालणार नाही. बेसिक गरजांचा विचार केला तर रिक्षावाले, भाजीवाले, चहाची टपरीवाले इ. लोकांशी संवादासाठी, व्यवहारासाठी तरी सर्वांना येणारी  अशी एक भाषा अस्तित्त्वात असावी आणि सध्या ती हिंदी आहे.

क) तीन वेगळ्या भाषा वापरणारे देश अस्तित्त्वात नाहीत कारण इतर कोणत्याही देशात आपल्यासारख्या विविध भाषा बोलल्या जात नाहीत. देशात सर्वत्र एकच भाषा बोलली जाते.

आपण उल्लेख केलेले फ्रान्स, जपान यासारखे देश त्यांच्या देशात इंग्रजीला आवश्यक मानत नाहीत. त्यांचा इतर देशांशी व्यवहार मात्र इंग्रजीतूनच चालतो. सुदैवाने त्यांच्याकडे अनुक्रमे फ्रेंच, जॅपनीज हीच सर्व देशाची भाषा असल्याने त्याव्यतिरिक्त आणखी कुठल्या भाषेची त्यांना गरज पडत नाही. आपल्याकडील माहिती इतर देशांना देण्यासाठी मात्र त्यांना भाषांतरकारांची गरज भासू लागली आहे आणि अशा दुभाषांना सध्या फार मागणी आहे. यातूनच आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो

मुद्दा २) हिंदी बरोबर इतरही भाषा शिकण्यासाठी उपलब्ध असाव्यात म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान वाढेल.

ह्या मुद्द्याशी सहमत आहे. अशा भाषा शिकण्याची सुविधा अनेक शाळांत, कॉलेजात उपलब्ध आहे.

अ) अनेक शाळांत आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी ५० मार्कांचे हिंदी ५० मार्कांचे संस्कृत अशी सुविधा किंवा संपूर्ण संस्कृतही शिकता येते. (संस्कृत ही आवड, उपयोग फारसा नाही हे मान्य आहे.)

ब) इंग्रजी माध्यमाच्या किंवा कॉन्व्हेंट (कृपया मराठी शब्द सुचवा) शाळांत आठवी ते दहावी जर्मन, फ्रेंच इ. परकीय भाषा शिकण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.

क) कॉलेजात अकरावी पासून जर्मन, फ्रेंच, जॅपनीज, संस्कृत, रशियन, उर्दू, स्पॅनिश इ. अनेक भाषा शिकण्याची सोय आहे. तसेच ह्या भाषांत पदवी, पदव्युत्तर शिक्षणच नव्हे तर पी. एच. डी. सुद्धा करता येते. (मी स्वतः जर्मन भाषेचा पदवीधर आहे.)

ड) पुणे विद्यापीठाचा फर्ग्युसन रस्त्यावर 'रानडे इन्स्टिट्युट' नावाचा स्वतंत्र परकीय भाषा विभाग आहे. इथे जर्मन, फ्रेंच, जॅपनीज, संस्कृत, रशियन, उर्दू, स्पॅनिश, चिनी इ. अनेक भाषांत विद्यापीठाची पदवी मिळते किंवा नोकरी करून अशा भाषा शिकणाऱ्यांसाठी  सर्टिफिकेट, डिप्लोमा व ऍडव्हान्स डिप्लोमा (प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका) अशा तीन स्तरांत सायंकालीन वर्ग चालवले जातात त्यालाही विद्यापीठाचीच पदवी मिळते.

इ) बंगाली, तमीळ, आणि इतर भारतीय भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारतर्फेच सहा-सहा महिन्यांचे वर्ग चालवले जातात. या वर्गाअंतर्गत माझे मित्र उर्दू शिकत होते. याबाबतची अधिक माहिती मिळवून देईन.

धन्यवाद !