लिपिसुधारणा आणि शुद्धलेखनसुधारणा यांत फरक आहे. १९९९ साली ऊंझा येथील साहित्यसंमेलनात जे ठरले ते गुजराथी शुद्धलेखनात सुचवलेले बदल होते.  सामान्य लोक बोलताना उच्चारतात त्याच पद्धतीने भाषेतील सर्व गुजराथी शब्दांमधील ईकार दीर्घ, आणि उकार ऱ्हस्वच लिहावेत, हा तो नवा नियम. हा नियम दिसायला नवीन असला तरी असंख्य गुजराथी शब्दांचे उच्चारण व लिखाण आज वर्षांनुवर्षे याच प्रकारे होत आले आहे.  फक्त असे लिखाण नियमबद्ध केले गेले एवढाच फरक. अशा रीतीने फक्त मूळ गुजराथी शब्दांमधील ईकार-उकार लिहावयाचे आहेत, संस्कृत किंवा अन्य भाषांतून आलेले तत्सम शब्द जसे त्या भाषांत लिहितात तसेच लिहायचे आहेत.  

इतके असूनही या ऊंझा नियमांना सार्वत्रिक मान्यता मिळालेली नाही. अजूनही गुजराथी जोडणीकोशात(=शुद्धलेखनकोशात) शेकडो शब्द हा नियम न पाळणारे दिसतील. ऊंझा जोडणीविषयी उलटसुलट चर्चा करणारे दुवा क्र. १ आणि दुवा क्र. २  हे दुवे पहा. 

सावरकरांनी(१९२७) लिपीत फक्त दोन सुधारणा सुचवल्या.(१) इ, ई, ए आणि ऐ ही अक्षरे 'अ'ला वेलांटी/मात्रादेऊन लिहावीत आणि (२)'ऱ्य'मधला जो 'र'चा अर्धा भाग आहे त्याला काना देऊन पूर्ण 'र' लिहावा. अशाच प्रकारे ल, क आणि फ ही अक्षरे काना देऊन लिहावीत. क्ष हे अक्षर क्‍ष असे लिहावे. या सुधारणा केल्यामुळे टंकलेखन यंत्रावरील नऊ कळी वाचतील आणि सर्व मराठी मुळाक्षरे कळफलकावर बसतील.

ब्राह्मी लिपीतून देवनागरी विकसित झाली याला लिपिउत्क्रान्ती म्हणता येईल, लिपिसुधारणा नव्हे. ज्या लेखणीने रेतीवर लिहता येईल तिने दगडावर कोरता येत नाही. त्यामुळे अनेक वक्ररेषा असलेल्या अक्षरांची लिपी योग्य अवजारे मिळाल्यावरच विकसित झाली. भिंतींवर रंगवण्यासाठी, लाकडावर कोरण्यासाठी किंवा भूर्जपत्रांवर लिहिण्यासाठी उचित अशाच लिप्या त्या त्या काळात निर्माण झाल्या. शिवाय छपाई नसल्याने लिपीतील अक्षरांचे प्रमाणीकरण झाले नव्हते.  म्हणून आजही अशोक किंवा ब्राह्मी लिपीतील लिखाण वाचण्याचे काम तितकेसे सोपे नाही. 

आजची देवनागरी १३व्या शतकात परिपूर्ण झाली.  त्यानंतर आजतागायत तिच्या मूळ रूपात फक्त प्रमाणीकरण आणि सफाई याहून काहीही फरक पडला नाही. देवनागरीत सुधारणा करण्याचे प्रयत्‍न अनेकांनी(एकूण ६५ जणांनी) केले, (पहिला प्रयत्‍न गुंजीकरांचा-सन १८७४.)परंतु लिपीत कुठलीही मूलगामी सुधारणा करणे शक्य झाले नाही. सर्वात शेवटची सुधारणा: १९६६ मधली. भारत सकारच्या धोशामुळे श, ख आणि ल ही हिंदी वळणाची अक्षरे मराठीत दाखल झाली. (महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण आणि समाजकल्याण मंत्रालयाचा  २४ सप्टेंबर १९६६ चा जी. आर. नं. देनाक १०६०-म). ---अद्वैतुल्लाखान