इंग्रजी भाषा समजणारे जास्तीत जास्त लोक ज्या देशात आहेत असा भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे भारताची राष्ट्रभाषा त्या अर्थाने इंग्रजीच आहे. हीच भाषा आपल्याला आंतरप्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहाराला उपयोगी पडते. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीला पर्याय नाही.  मराठी भाषा उत्तम लिहिता येणारी माणसे महाराष्ट्रातही कमीकमी होत चालली आहेत, परंतु उत्तम इंग्रजी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी, इतर भारतवासीयांशी उत्तम संबंध हवे असतील तर हिंदी भाषा लिहिता नाही आली, तरी उत्कृष्ट रीतीने बोलता आली पाहिजे.  उच्चार अगदी प्रगल्भ हिंदी भाषकासारखे जमले पाहिजेत.  हिंदी न आल्याने आपले खासदार सभागृहात तोंड उघडत नाहीत.  आपल्या उपमुख्यमंत्र्यांना २६/११ नंतर वाईट हिंदीमुळे राजीनामा द्यावा लागतो यावरून तरी हिंदीचे महत्त्व लक्षात यावे. मराठी आणि हिंदी या दोघांची लिपी जवळजवळ सारखी आहे, तिचा फायदा घेऊन आपण उत्तम हिंदी बोलायला शिकले पाहिजे.

घटनेत लिहिलेले नसले तरी जनसामान्यांच्या मते, इंग्रजी ही भारताची लेखी राष्ट्रभाषा आणि हिंदी ही मौखिक राष्ट्रभाषा आहे.

माझ्या मते प्रत्येक मराठी माणसाला किमान पाच भाषा उत्तम रीतीने समजल्या पाहिजेत. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि एक अन्य भारतीय आणि एक विदेशी भाषा. याहून अधिक भाषांचा अभ्यास जरूर करावा.  आणि हे अशक्य नाही.