हे मांडताना अतिशय खेद वाटतो, पण अनेकदा हा अनुभव येतो. मराठीच माणसे, अगदी जवळची, मैत्रीतील परंतु मराठीतून बोलत नाहीत, लिहीत नाहीत. मातृभाषेतून बोलण्याची एकही संधी गमवावी असे न वाटल्याने जर आपण मराठीतून बोलत राहिले तर संभाषणात जास्त इंग्रजी व तोंडी लावायला मराठी असे चालते. नंतर मागाहून टिंगलटवाळी केली जाते. ह्या मागची मानसिकता काही उमगत नाही.

ह्याउलट कधी कधी काही अनपेक्षित ठिकाणी स्वच्छ व आत्मीयतेने मराठीतून संभाषण होते. आवर्जून मातृभाषेत काही लोक बोलायला उत्सुक असतात. मुंबई एअरपोर्टवर मी नेहमी हा अनुभव घेते. मी मराठीतूनच बोलते व तिथला सगळा स्टाफही बोलतो. गुजराती लोकांकरिता तर अमेरिकन दूतावासात एवढेच काय इथे अनेक एअरपोर्टवरही खास गुजरातीतून बोलणारा स्टाफ ठेवलेला आहे.

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे व तीही आलीच पाहिजे असे मलाही वाटते. पण वर्षोनवर्षांच्या अनुभवावरून लक्षात आलेय ते म्हणजे महाराष्ट्रातले लोक खरेच  चांगले हिंदी बोलतात. मुंबईत राहिल्याने बऱ्याच वेळा हिंदीत बोलावेच लागते. पण आधी मराठीतच सुरवात करावी समोर अगदीच कोरी पाटी असेल तर मग हिंदीत बोलावे. आमच्या ऑफिसमध्ये कारभार मराठीतूनच होता, आहे बहुतांशी. व्यापारा संबंधी असलेले मात्र सगळे इंग्रजी भाषेतच होते. नेहमी येणारा अनुभव म्हणजे गुजराती व्यापारी हमखास त्याच्या तोडक्यामोडक्या मराठीतच बोलणार, व इतर भाषिक मात्र चुकूनही प्रयत्नही करीत नसत. ( यावर फार लिहिण्यासारखे आहे परंतु आज इथे नको. )

तुम्ही दक्षिणेत गेलात की ते लोक मुळीच हिंदी किंवा इंग्रजीत तुमच्याशी बोलत नाहीत. त्यांना कळत असते की समोरच्या माणसाला आपली भाषा अजिबात समजत नाहीये व त्यांना इंग्रजी येत असते पण ते बोलत नाहीत. मग मराठी माणसेच आपल्या मराठी माणसांबरोबरही का बरे इंग्रजीतून बोलतात? दोन दक्षिणी भेटले की नुसते कडकट्ट करू लागतात. तेच सिंधी, गुजराती, बंगाली लोकांचे. आपले कोणीतरी जवळचे भेटल्याचा आनंद नुसता सांडत असतो बोलण्यातून. म्हणजे आपल्याला आनंद होतच नाही की परिटघडीची इस्त्री मोडली जाईल असे वाटते.

संपूर्ण शुद्ध मराठीतून बोलले पाहिजे असे वाटले तरी काही इतर भाषिक शब्द सहज तोंडात येणारच हे गृहीत आहेच. पण मराठीत बोलणे हेच मुळी काहीतरी चूक केल्यासारखे लोकांना वाटते.