हा तर्कही योग्य वाटतो व एक राष्ट्रभाषा असायलाच हवी.
ती हिंदीच का आहे हा वेगळा प्रश्न आहे. मात्र ती सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे हेही सिद्ध झालेले आहे.
त्या खालोखाल तेलगूचा क्रमांक येतो, पण ती बऱ्याच इतर राज्यांमध्ये समजणार नाही हे शक्य आहे.
राष्ट्रभाषेची गरज ही असावी की ज्याप्रमाणे एकच चलन असावे तशी भाषाही 'कायद्याने' एकच असावी. हे माझेही मत आहे व कागवटे यांच्याशी पूर्ण सहमत आहे.
भारत म्हणजे फक्त काही शहरे नाहीत ( दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, बेंगलोर, अहमदाबाद, कोचीन, हैदराबाद, पुणे वगैरे ) जिथे हिंदीला किती महत्त्व आहे यावरून राष्ट्रभाषा असावी की नसावी हे ठरवले जावे. मी भारतभर प्रवास केला आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदीला प्रतिसाद मिलत नाही हे खरे असले तरी त्यांची गरज असेल तेव्हा ते आपल्याशी हिंदी बोलतात व बोलूही शकतात हे सत्य मी अनुभवले आहे. तसेच धनबाद ( बिहार ) , राउरकेला ( ओरिसा ), खोर्दा ( ओरिसा ), आणंद ( गुजरात ), हिरमी ( छत्तीसगढ ) अश्या अनेक अत्यंत लहान गावात तुम्ही हिंदीमध्ये व्यवस्थित संवाद करू शकता. ही हिंदीभाषिक राज्ये असल्याने असेल असा अंदाज असल्यास खालील नावे वाचावीत.
मलखेड ( कर्नाटक ), तांडुर ( आंध्र ), रामागुंडम ( आंध्र ), बेल्लारी / होस्पेट ( कर्नाटक ), एर्नाकुलम या सर्व ठिकाणी अगदी रिक्षावालेही हिंदी समजू शकतात व बोलू शकतात. ती भाषा हा देशाच्या परिचयाचा भाग असू शकतो.
मराठी संपुष्टात येत आहे असा अतर्क्य अंदाज बांधताना काही लोकांना हिंदी अनावश्यक का वाटते काही समजत नाही.