हिंदी शिकल्याने भारताच्या बऱ्याच मोठ्या भूभागात (आणि भारताबाहेर नेपाळमध्ये आणि काही कारणाने पाकिस्तानात जाण्याची गरज पडल्यास उर्दूशी - विशेषतः पाकिस्तानातील सामान्य माणसाच्या बोली उर्दूशी - साधर्म्यामुळे पाकिस्तानातसुद्धा) संवाद साधणे सोपे जाते हा मुद्दा सर्वस्वी मान्य आहे. त्याबद्दल आक्षेप नाही, कधीच नव्हता.
त्यामुळे (राष्ट्रभाषा असणे हे आवश्यक आहेच याबद्दल अजूनही साशंक असलो तरी) राष्ट्रभाषा असणे हे सोयिस्कर आहे हे मान्य. आणि केवळ या कारणासाठी एक वैयक्तिक सोय म्हणून हिंदी शिकण्यास काहीच आक्षेप नाही. उलट प्रत्येकाने जरूर शिकावी. ते निश्चितच फायद्याचे आहे.
मात्र त्याला राष्ट्रीय कर्तव्य वगैरे म्हणून त्याची सक्ती करण्यास निश्चित आक्षेप आहे. राष्ट्रभाषा ही कदाचित सर्वांचीच समाईक वैयक्तिक सोय असू शकेल, पण ती मूलतः एक वैयक्तिक सोयच आहे, राष्ट्रीय कर्तव्य वगैरे नाही. तशी ती कोणीही उठून ठरवण्याचेही कारण नाही. आणि ती न शिकण्याने न शिकणाऱ्याचे वैयक्तिक नुकसान होऊ शकेल, परंतु तो दखलपात्र गुन्हा, विशेषतः राष्ट्रद्रोहाच्या दर्जाचा गुन्हा, ठरण्याचे काहीही कारण नाही. (तशी ती ठरवल्यास कोण्याही सोम्यागोम्याची दुसऱ्यावर वचपा काढण्याची वैयक्तिक सोय फक्त होईल. हे आणखी एक हुकुमशाही तत्त्व - सोम्यागोम्यांच्या वैयक्तिक हुकुमशाहीचे तत्त्व -रुजवण्याची काहीही गरज नाही; आहेत तेवढी पुरे आहेत!)
बस एवढेच.