लोकशाही तत्त्वाने एकसंघता येणार नसेल तर हुकूमशाहीचा प्रयोग करावा का?

तसेच करायचे असेल, तर मग ब्रिटिश राजवट काय वाईट होती? मग आपण स्वातंत्र्यासाठी का लढलो, आणि इतके लोक स्वातंत्र्याच्या वेडापायी प्राणास का मुकले?

ब्रिटिशांच्या राज्यात तरी काय होते? कोणीही गोरा सोम्यागोम्या उठून हा देश कसा चालला पाहिजे, राजद्रोह (त्या काळातील राष्ट्रद्रोहाशी समतुल्य कल्पना) म्हणजे काय, कोणती गोष्ट हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा काय, या देशातल्या लोकांसाठी काय चांगले आहे नि काय वाईट वगैरे गोष्टी या देशातील लोकांना आपल्या भल्याबुऱ्याविषयी काय वाटते याची यत्किंचितही कदर न करता ठरवायचा.

ब्रिटीशांच्या राज्यातल्या गोऱ्या सोम्यागोम्याची जागा स्वतंत्र भारतातील देशी पावट्याने घ्यावी काय?

गोरे सोमेगोमे निदान देशी पावट्यांपेक्षा संख्येने कमी होते. आणि हो, ब्रिटिशांच्या राज्यात निदान (समाईक शत्रू असल्यामुळे का होईना) तुलनेने अधिक एकी, एकसंधता, भावनिक ऐक्य वगैरे वगैरे भानगडी तरी होत्या. देशी पावट्यांनी 'राष्ट्रीय एकात्मता रुजवणे' वगैरेंच्या नावाखाली नाही नाही त्या गोष्टी आणून, लादून वाट लावली, लावताहेत.

भावनिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता वगैरे गोष्टी कायदे करून, हुकूमशाहीने आणता येत नाहीत याची कृपया नोंद व्हावी.

लोकशाही हा "स्वातंत्र्य झटका" वगैरे आहे म्हणून हुकूमशाही आणण्याचे प्रकार आपल्या शेजारी राष्ट्रात स्वातंत्र्यापासून होत आले आहेत. गरजूंनी आपल्या शेजारी राष्ट्राच्या सद्यपरिस्थितीबद्दल चौकशी करावी. राष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी १९७१मध्ये (खरे तर १९७१पर्यंत) केलेल्या लष्करी हुकूमशाहीला किती घवघवीत यश आले त्याबद्दलही जाणून घ्यावे.

जगात इतरत्रही पण विशेषतः आपल्या जवळपासच्या काही प्रतिष्ठित राष्ट्रांत या "स्वातंत्र्य झटक्यां"पासून लोकांना वाचवण्यासाठी विधायक हुकूमशाहीचे असेच प्रयोग चालू आहेत. त्या राष्ट्रांतील लोक किती सुखी, समाधानी आणि आनंदी आहेत हे जमल्यास प्रत्यक्षात जाऊन अनुभवून यावे आणि अशा प्रयोगांची तोंड भरून प्रशंसा करावी.