पण ते जाळल्यामुळे होणारे देशाचे नुकसान जर रु. १/- चे असेल तर तो दंडपात्र गुन्हाच.

मुळात तो गठ्ठा जाळल्याने देशाचे रु. १/-चे का होईना, पण नुकसान कसे झाले, हे मला कोणी समजावून सांगू शकेल काय?

(तो गठ्ठा जर मी जाळला नसता तर ते रुपये कोणा गरिबाला उपयोगी पडले असते, वगैरे प्रतिवाद कृपया करू नयेत. त्यात काहीही तथ्य नाही. तो गठ्ठा जर मी जाळला नसता तर तातडीने उठून तो मी कोणा गरिबाला दान केला असता अशा भ्रमात राहू नये. तशा परिस्थितीत तो मी बँकेत - किंवा त्याहीपेक्षा गादीखाली - ठेवण्याची शक्यता अधिक. माझ्या वापरात नसलेल्या संपत्तीचे मुक्तहस्ते वाटप करायला मी बसलेलो नाही.)

उलट, तो गठ्ठा जाळल्याने बाजारातील रुपयांचा पुरवठा कमी करून (आणि पर्यायाने बाजारातील रुपयांची मागणी, त्याद्वारे रुपयाची खरेदी करण्याची शक्ती, त्याद्वारे रुपयाचे मूल्य आणि म्हणूनच भारतीय चलनाची आणि पर्यायाने भारताची शान वाढवून) मी देशाचा फायदाच करीत आहे, हा माझा दावा कायम आहे. माझ्या दाव्यातील चूक दाखवून द्यावी; अन्यथा या महान त्याग सोसून केलेल्या देशकार्याबद्दल मला भारतरत्न पुरस्कार का बहाल करण्यात येऊ नये याचा खुलासा व्हावा.

व्यक्तीस्वातंत्र्य हे समाजहितापेक्षा मोठे की लहान?

मुळात व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजहित हे परस्परसमावेशक नाहीत या गृहीतकाला आधार काय?

दुसरी गोष्ट, समजा मला हिंदी येत नसेल (प्रत्यक्षात मला चांगले हिंदी येते. काही वर्षे हिंदीभाषक मुलुखात राहिलेलोही आहे; त्यामुळे बोली हिंदीच्या काही बाजांशी थोडाफार परिचयही आहे. आणि म्हणूनच 'मराठी माणसाचे हिंदी भयंकर असते आणि विशेषतः हिंदीतले उच्चार भयंकर असतात' यासारखी विधाने मी बिनदिक्कत करू शकतो. तो मुद्दा नाही. पण उदाहरणादाखल मला हिंदी येत नाही असे मानू.), तर भारतात महाराष्ट्राबाहेर कोठे गेल्यास मला अडचण येईल, यात माझे वैयक्तिक नुकसान आहे. पण यात समाजहिताला बाधा नेमकी कशी पोहोचली? एखादा हिंदीभाषक किंवा अमराठीभाषक माझ्याशी संवाद साधू शकणार नाही, हे खरे आहे. पण माझ्याशी संवाद साधण्यावाचून त्या हिंदीभाषकाचे किंवा अमराठीभाषकाचे नेमके काय अडते असे वाटते? 'तू नाही तर तुझा काका' म्हणून तो पुढच्या (हिंदी समजणाऱ्या) माणसाशी संवाद साधेलच, काळजी नसावी!

त्याहीपुढे जाऊन, समजा त्या माणसाला माझ्या आजूबाजूला, माझ्या प्रदेशात, माझ्या प्रदेशातल्या समाजात हिंदी जाणणारे कोणीच भेटले नाही (आणि अशा परिस्थितीत माझ्या आजूबाजूच्या समाजाची भाषा त्याला अवगत नसेल किंवा ती तो शिकला नाही), तर पुन्हा त्यातून फक्त त्या व्यक्तीचे वैयक्तिक नुकसान होईल. व्यापक समाजाचे त्यातून काडीचेही नुकसान (किंवा अहित) होणार नाही.

देशाच्या नुकसानीचे निकष काटेकोर करण्याइतपत प्रगल्भता आपल्या समाजाकडे नाही...

प्रगल्भतेने, ('व्यक्तिस्वातंत्र्य', 'समाजहित', 'राष्ट्रकार्य', 'राष्ट्रद्रोह', 'गुन्हा' वगैरेंसारख्या) शब्दांचे अवडंबर माजवून भावनिक चिखलात न गुंतता देशाच्या (म्हणजे पर्यायाने आपल्याच) फायद्यातोट्याचे निकष काटेकोर करण्यासाठीच तर हा आटापिटा आहे!

समाज किंवा राष्ट्र हे व्यक्तींपासून बनलेले असते, आणि व्यक्ती हा समाजाचा किंवा राष्ट्राचा अविभाज्य घटक आहे, हे लक्षात घेता समाजाचे किंवा राष्ट्राचे हित आणि स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या हित आणि स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही. ज्या समाजात किंवा ज्या राष्ट्रात व्यक्तीला स्वातंत्र्य नसते तो समाज किंवा ते राष्ट्र हे स्वतःच्या भूमीत सार्वभौम असले, तरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र असू शकत नाही. समाजहितासाठी किंवा राष्ट्रहितासाठी हुकूमशाही आणू पाहणारे हे फक्त समाजाला किंवा राष्ट्राला आपल्या वैयक्तिक (किंवा सांघिक) गुलामगिरीत (अनवधानाने किंवा जाणूनबुजून) ढकलू पाहत असतात. आणि 'आपल्या' किंवा 'परक्याच्या' गुलामगिरीत खरे तर फारसा फरक नाही, पण त्यात डावेउजवे करायचे झालेच, तर 'आपल्या'ची गुलामगिरी अधिक वाईट. कारण 'परका' जेव्हा वर्चस्व गाजवत असतो तेव्हा त्याचे 'वर्चस्व गाजवणे' हे दिसून तरी येते आणि त्याचा मुकाबला (करायचाच झाला तर) करता तरी येतो, पण 'आपला' जेव्हा वर्चस्व गाजवतो  तेव्हा त्यावर 'आपलाच आहे, आपल्याच भल्यासाठी करतोय'चे पांघरूण असते, ज्याच्याआड दिसणे (किंवा बघणे) कठीण जाते आणि प्रतिकार करणे त्याहूनही कठीण जाते. आपल्याच मनाचे दडपण आड येते. आणि याचा 'आपली'च लोक आपल्याच डोक्यावर वरवंटा फिरवण्यासाठी पुरेपूर उपयोग करतात.

हिंदीचे (किंवा समाईक भाषेचे, 'राष्ट्रभाषे'चे) असेच आहे. ज्यांना गरज असते किंवा उपयोग किंवा महत्त्व पटते ते आपण होऊन शिकतील (आणि शिकतातही). पण ज्यांना गरज नाही किंवा इच्छा नाही त्यांच्यावर ती का लादावी?

मुळात समाईक भाषा लागते कोठे?

१. जर मला परप्रांतातील एखाद्या व्यक्तीशी किंवा संस्थेशी काही व्यवहार करण्याची गरज लागली तर तेथे समाईक भाषा उपयोगी पडू शकेल. ज्या अर्थी मला अशा परप्रांतातल्या (अनोळखी किंवा असंबंधित) व्यक्तीशी किंवा संस्थेशी व्यवहार करण्याची गरज पडू शकते, त्याअर्थी त्या व्यक्तीचा किंवा संस्थेचाही (त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या दृष्टीने) परप्रांतांतील व्यक्तींशी किंवा संस्थांशी संपर्क होत असण्याची शक्यता पुष्कळ. अशा परिस्थितीत अशा संपर्कांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या (एक किंवा अनेक) समाईक भाषा त्या व्यक्तीस किंवा संस्थेस (निदान त्या संस्थेतील काही संबंधित व्यक्तींस) अवगत असणारच, किंवा नसल्यास स्वतःच्याच हिताच्या दृष्टीने अशा व्यक्ती किंवा संस्था अशा भाषा शिकण्याचे प्रयत्न आपण होऊन करतील.

२. जर मला परभाषक मुलुखात कायम किंवा दीर्घ काळाच्या वास्तव्यासाठी जायचे असेल, तर अशा परिस्थितीत गरज माझी असल्याने मी त्या प्रांतातील स्थानिक भाषा शिकावी हे उत्तम. मी तेथे अल्पकाळासाठी जात असल्यास अर्थात हे शक्य नाही. अशा परिस्थितीत त्या मुलुखातील काही जणांना तरी एखादी समाईक भाषा येत असेल याच्या भरवशावर तेथे काम चालवणे मला भाग आहे. (आणि त्यासाठी अशी एखादी समाईक भाषा अगोदरच अवगत असणे माझ्या हिताचे आहे, आणि म्हणून अशी एखादी समाईक भाषा मी माझ्याच हिताच्या दृष्टीने शिकेनच. ) मात्र माझ्या व्यक्तिगत सोयीसाठी तेथील प्रत्येकाने, तेथील समस्त समाजाने अशी समाईक भाषा शिकावी अशी अपेक्षा करण्याचा आणि काहींना किंवा अनेकांना तशी ती अवगत नसेल तक्रार करण्याचा मला अधिकार नाही. माझ्यासारखाच विचार करून एखादी समाईक भाषा शिकलेले किंवा अवगत असलेले तेथे काही जण तरी असतीलच, त्यांच्या आधारावर मला काम चालवावे लागेल. अन्यथा मला थोड्याफार अवगत असलेल्या कोठल्यातरी भाषेने काम चालू शकते का ते पाहावे लागेल आणि फारच वेळ पडली तर खाणाखुणांवर भागवावे लागेल. तसे अशा मुलुखात जायचेच झाले तर तेथे प्रचलित असलेल्या भाषेचा काही जुजबी परिचय, काही कामचलाऊ वाक्प्रचार शिकणे एवढा किमान गृहपाठ तरी मी करू शकतोच. गृहपाठाची जबाबदारी माझी आहे,  ती उचलण्याचा प्रयत्नही करण्याची माझी इच्छा नसेल तर अशा ठिकाणी मी जाऊ नये. समाईक भाषा ही माझ्यासाठी वैयक्तिक सोय आहे, इतरांनी माझ्यासाठी निभावण्याचे कर्तव्य किंवा इतरांची जबाबदारी नव्हे.

थोडक्यात, गरजेपोटी किंवा स्वेच्छेने ज्यांना एखादी समाईक भाषा शिकायची ते शिकतीलच (आणि प्रत्येकाने जरूर शिकावी), पण ती धोरणाने लादली जाऊ नये. तशी ती शिकण्याचे प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण ते राष्ट्रकर्तव्य नाही. उलट त्याला राष्ट्रकर्तव्य वगैरे बनवून ते धोरणाने लादल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळावण्याऐवजी तेढ वाढण्याची आणि असलेल्या ऐक्याला, असलेल्या राष्ट्रभावनेला तडा जाण्याची शक्यता अधिक.