इंग्रजी भाषेत गझल बऱ्यापैकी रुजली आहे/रुजते आहे, मान्यता पावली आहे/पावते आहे. हे काही दुवे -

१. गझल - या दुव्यावर इंग्रजी गझलांबद्दल काही जुजबी माहिती, थोडासा इतिहास आणि काही दखलपात्र कवींच्या इंग्रजी गझला वाचता येतील.

२. दि गझल पेज् - हे मासिक इंग्रजी गझलेला वाहून घेतले आहे. काही रंजक रचना (इंग्रजी गझला), इंग्रजी गझलेबाबत मतमतांतरे येथे वाचता येतील.

गूगलवर शोधल्यास असे कित्येक दुवे सापडतील; मी शक्यतो दि गझल पेज् ला वारंवार भेट देऊन चाळत असतो.

नुसते इंग्रजीच नाही तर इतरही भाषांमध्ये गझल रुजते आहे/रुजली आहे. या काव्यप्रकारास भाषक मक्तेदारी मान्य नसावी. गझलेचे तंत्रमंत्र, तत्त्वज्ञान भाषानिरपेक्ष आहे असे वाटते. फरक कोठे आहे? तर रूपके, शब्द, भाषिक वैशिष्ट्ये, संस्कृती यांमध्ये. त्यानुसार त्या त्या भाषेतील गझलेत फरक दिसणारच/असणारच.

गझल उर्दूतून आली असली तरी कित्येक भाषांमध्ये रुजली आहे; रुजते आहे. प्रत्येक भाषेचे स्वतःचे वैशिष्ट्य व संस्कृती जपणारी रूपके, शब्द इ. त्या त्या भाषेतील गझलांमध्ये यावीत असे मला वाटते. आदरणीय सुरेशदादांचे गझलेच्या बाराखडीतील 'मराठी भाषेला मराठी मातीचाच सुगंध' आला पाहिजे, हे वाक्य राहून राहून आठवते. त्यामुळे जितक्या कटाक्षाने टेबल, पेन इ. शब्द टाळायचे असतील, तितक्याच कटाक्षाने उर्दू व बिगर मराठी शब्द टाळावेत असे मला वाटते. काही बिगर मराठी शब्द मराठी भाषेचाच अविभाज्य भाग बनले आहेत - जसे टेबल/मेज - जरी ते इंग्रजी, उर्दू वा इतर कोणत्या भाषेतून आले असले तरी. असे शब्द मराठी गझलेत योजण्यास प्रत्यवाय नसावा. तसेच सद्य जीवनशैली, संस्कृती यांचे जागतिक आदानप्रदान होताना जे शब्द सापडतात - ज्यांच्यासाठी मराठी शब्द सध्यातरी अस्तित्त्वात नाहीत (उदा. ओव्हन्, डॉलर् इ. ) - असे शब्द मराठी गझलेत वापरले जाण्यास काय हरकत आहे? मात्र जासूस, साकी अशा शब्दांसाठी सुटसुटीत मराठी शब्द नक्कीच अस्तित्त्वात आहेत; म्हणून त्यांच्या उपयोजनाचा आग्रह. तेच आराम 'घे' च्या बाबतीत.

माझी मते पटलीच पाहिजेत असा आग्रह मुळीच नाही/नसेल.

धन्यवाद.