टग्या,
आपला सविस्तर प्रतिसाद आवडला.
तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत, ते केवळ काहीतरी लक्षवेधक आणि बहुतेकांना (कदाचित स्वतःलाही?) अगम्य असे नसून त्यांचे तुम्हाला स्वतः ला पूर्णपणे आकलन आहे आणि तुम्ही त्यांचे (खरोखर) समर्थन करता असे वाटते. छान!
समाज किंवा राष्ट्र हे व्यक्तींपासून बनलेले असते, आणि व्यक्ती हा समाजाचा किंवा राष्ट्राचा अविभाज्य घटक आहे, हे लक्षात घेता समाजाचे किंवा राष्ट्राचे हित आणि स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या हित आणि स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही. ज्या समाजात किंवा ज्या राष्ट्रात व्यक्तीला स्वातंत्र्य नसते तो समाज किंवा ते राष्ट्र हे स्वतःच्या भूमीत सार्वभौम असले, तरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र असू शकत नाही. समाजहितासाठी किंवा राष्ट्रहितासाठी हुकूमशाही आणू पाहणारे हे फक्त समाजाला किंवा राष्ट्राला आपल्या वैयक्तिक (किंवा सांघिक) गुलामगिरीत (अनवधानाने किंवा जाणूनबुजून) ढकलू पाहत असतात. आणि 'आपल्या' किंवा 'परक्याच्या' गुलामगिरीत खरे तर फारसा फरक नाही, पण त्यात डावेउजवे करायचे झालेच, तर 'आपल्या'ची गुलामगिरी अधिक वाईट. कारण 'परका' जेव्हा वर्चस्व गाजवत असतो तेव्हा त्याचे 'वर्चस्व गाजवणे' हे दिसून तरी येते आणि त्याचा मुकाबला (करायचाच झाला तर) करता तरी येतो, पण 'आपला' जेव्हा वर्चस्व गाजवतो तेव्हा त्यावर 'आपलाच आहे, आपल्याच भल्यासाठी करतोय'चे पांघरूण असते, ज्याच्याआड दिसणे (किंवा बघणे) कठीण जाते आणि प्रतिकार करणे त्याहूनही कठीण जाते. आपल्याच मनाचे दडपण आड येते. आणि याचा 'आपली'च लोक आपल्याच डोक्यावर वरवंटा फिरवण्यासाठी पुरेपूर उपयोग करतात.
या परिच्छेदातील विचारांशी पूर्णतः सहमत. आज-काल आपल्या देशात ठिकठिकाणी 'आपल्यां'ची हुकूमशाही वाढतेय आणि सर्वसामान्य नागरिक त्या वरवंट्याखाली भरडला जातोय.
गरजेपोटी किंवा स्वेच्छेने ज्यांना एखादी समाईक भाषा शिकायची ते शिकतीलच (आणि प्रत्येकाने जरूर शिकावी), पण ती धोरणाने लादली जाऊ नये. तशी ती शिकण्याचे प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण ते राष्ट्रकर्तव्य नाही. उलट त्याला राष्ट्रकर्तव्य वगैरे बनवून ते धोरणाने लादल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळावण्याऐवजी तेढ वाढण्याची आणि असलेल्या ऐक्याला, असलेल्या राष्ट्रभावनेला तडा जाण्याची शक्यता अधिक.
मूळ चर्चाविषयाबद्दलच्या वरील मताशी सहमत.
-------------------------------------------
(वाचनाच्या सोयीसाठी टग्या यांच्या प्रतिसादातील मोठे परिच्छेद जसेच्या तसे उतरवले आहेत.)