लोण्याऐवजी ऑलिवचे अतिअनाघ्रात तेल (एक्स्ट्रा-वर्जीन ऑलिव ऑइल) वापरलेले चालू शकेल काय?

अधिक विचाराअंती, या पाककृतीत लोण्याऐवजी अतिअनाघ्रात ऑलिवतेल वापरता येईल का, याबद्दल साशंक आहे.

अतिअनाघ्रात ऑलिवतेल हे प्राथमिकतः त्याच्या स्वादासाठी (आणि आरोग्यालाही चांगले या दुय्यम कारणासाठी) खाल्ले जाते. पाव हा लोणी लावून खाण्याऐवजी, एका बशीत अतिअनाघ्रात ऑलिवतेल ओतून, नुकत्याच जाड दळलेल्या ताज्या मिरपुडीची त्यावर पखरण करून, पावाचे लचके तोडून त्यात बुडवून खाल्ले असता अत्युत्कृष्ट लागतो. किंबहुना अमेरिकेतील काही इटालियन उपाहारगृहांत जेवणापूर्वी टेबलावरील एका बशीत अतिअनाघ्रात ऑलिवतेल ओतून त्यावर गिऱ्हाइकाच्या डोळ्यांसमोर हातदळणीने दळलेली मिरपूड पसरून त्यासोबत जेवण येईपर्यंत चघळण्यासाठी म्हणून अमर्यादित पाव (हे सर्व फुकट) देताना पाहिले आहे, खाल्लेही आहे.

मात्र, अतिअनाघ्रात ऑलिवतेलाचा असा उपयोग हा तेल कच्चे असतानाच होऊ शकतो. ज्या स्वादासाठी म्हणून अतिअनाघ्रात ऑलिवतेल खायचे, तो स्वाद उच्च तापमानाने नष्ट होतो. या कारणास्तव अतिअनाघ्रात ऑलिवतेल हे नेहमी कच्चेच वापरले जाते. (जसे, पाव बुचकळून खाण्यासाठी किंवा सॅलडवर पसरण्यासाठी वगैरे.) शिजवण्यासाठी अतिअनाघ्रात ऑलिवतेल कधीही वापरले जात नाही. (ऑलिवतेल, त्यातही अतिअनाघ्रात ऑलिवतेल, हे तसेही महाग असते. त्यातून अतिअनाघ्रात ऑलिवतेल हे जर खास स्वादासाठी म्हणून खायचे, तर तो स्वाद जर शिजवताना नष्ट होणार असेल, तर शिजवण्यासाठी अतिअनाघ्रात ऑलिवतेल वापरणे हा पैशाचा निव्वळ अपव्यय आहे. ) त्याऐवजी सहसा तितकासा स्वाद नसलेले आणि किमतीनेही तुलनेने स्वस्त असलेले 'विशुद्ध ऑलिवतेल' (प्युअर ऑलिव ऑइल) हे शिजवण्यासाठी वापरले जाते. (ऑलिवतेलाचे आरोग्यात्मक फायदे त्यातूनही काही प्रमाणात मिळतातच असे वाटते - चूभूद्याघ्या.)

वरील कारणांसाठी प्रस्तुत पाककृतीत लोण्याऐवजी अतिअनाघ्रात ऑलिवतेल हे कदाचित वापरता येणार नाही असे वाटते. (उलटपक्षी, प्रस्तुत पाककृतीत लोण्याचा वापर हा केवळ मंद आंचेवर बटाटे परतण्यासाठी करायचा आहे, तेव्हा आंच मंद असल्यामुळे कदाचित तापमान तितकेही उच्च होत नसावे, त्यामुळे लोण्याऐवजी अतिअनाघ्रात ऑलिवतेलाचा उपयोग कदाचित चालूही शकेल असेही वाटते. चालू शकल्यास हाही एक चवदार आणि आरोग्यदायक पर्याय ठरावा.)

मात्र प्रस्तुत पाककृतीत (लोण्याऐवजी) अतिअनाघ्रात ऑलिवतेल चालो वा ना चालो, या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लसणाच्या चटणीत कच्चे ओतून खाण्यासाठी अतिअनाघ्रात तेलाचा वापर खचितच होऊ शकतो, आणि तयार होणारे मिश्रण चांगलेही लागते. प्रयोग करून खात्री करून घेतली आहे.