वरील उतारा हा 'पावटेशाहीचा इतिहास' या फादर पावलो पावरोटी यांनी अस्खलित मराठीत लिहिलेल्या ग्रंथातून घेतला असून, प्रस्तुत ग्रंथ हा इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीच्या सर्व शाखांच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षाकरिता 'वाचनावश्यक' (रिक्वायर्ड रीडिंग) म्हणून नेमला गेला आहे, याची कृपया नोंद व्हावी.

फादर पावलो पावरोटी (सुप्रसिद्ध दिवंगत ऑपेरागायक लुचियानो पावरोटी यांचे एक पूर्वज) हे इटालियन पाद्रीमहाशय ख्रिस्तीधर्माच्या हिंदुस्थानातील प्रसाराच्या प्रगतीचा अभ्यास व आढावा घेण्यासाठी एकोणिसाव्या शतकात खास पोपमहाशयांच्या आदेशाने हिंदुस्थानात आले. येथे येऊन मराठी भाषा आत्मसात करण्यामधील त्यांची प्रगती व त्यामागील जिद्द वाखाणण्यासारखी आहे. (या कामात त्यांना स्थानिक तज्ज्ञांचीही मदत झाल्याबद्दल कळते.) 'ख्रिस्तीधर्माचा हिंदुस्थानातील प्रसार: पद्धती आणि प्रगती', 'ख्रिस्ती धर्मप्रसार आणि मराठी भाषा' आणि 'पावटेशाही' या तिन्ही विषयांवरील त्यांची मते ही त्यात्या विषयांतील अखेरच्या शब्दांसमान मानली जातात.

विविध एतद्देशीय भाषांतील 'रोटी' या शब्दाचा उगम त्यांच्या आडनावातूनच आहे, हेही विशेष करून लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच, 'ओ लॉर्ड, गिव अस अवर डेली ब्रेड' या (सहसा इंग्रजीतून सर्वज्ञात असलेल्या) सुप्रसिद्ध ख्रिस्ती प्रार्थनेच्या भाषांतराकरिता 'देवा, मला पाव!' हा मराठी तर्जुमा त्यांनीच सुचविला, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.

किंबहुना 'पाव'ट्यामधील 'पावा'चाही हाच उगम असावा का, यावर तज्ज्ञांत मतभेद आहेत असे कळते.

वरील वाक्यातील "'पाव'ट्यातील 'पावा'"च्या उल्लेखाचा रोख हा 'पावटा' या शब्दामध्ये 'पाव' हा शब्द अंतर्भूत असण्याकडे आहे, की विहिरीच्या पाण्याबरोबर प्राशन केल्यामुळे पावट्याच्या पोटात अंतर्भूत असलेल्या पावाकडे आहे, याबद्दलही तज्ज्ञांत मतभेद आहेत असे कळते.