हे  हृदय का धडकते आहे? ही पृथ्वी का सूर्या भोवती फिरते आहे? हा सूर्य का प्रकाशमान आहे? या रात्रीच्या चांदण्याला काय अर्थ आहे?  याला काहीही अर्थ नाही आणि म्हणूनच त्याची सार्थकता त्याच्या असण्यातच आहे. जर पृथ्वी आता सूर्याच्या गुरुत्वाकर्षणा बाहेर गेली तर असे का झाले हे कोण कुणाला विचारणार, एका क्षणात सगळे संपू शकते म्हणून या सर्वाची मजा आहे. निर्मिती हा निराकाराचा आनंद आहे, ती निराकाराची अंर्तनिहीत संभावना आहे. हे सगळे आपोआप चालू आहे. चालले तर चालले नाही तर नाही असे पूर्ण स्वतंत्र्य आहे. निराकार मुक्त आहे आणि तीच खरी मजा आहे. अर्थ शोधून सगळी मजा जाईल, अर्थ संपल्यावर काय करणार? निराकाराची निर्मिती क्षमताच किती आनंददायी आहे, मधुबाले नंतर असे सौंदर्य परत होईल की नाही वाटते तो पर्यंत रेखा येते, माधुरी निर्माण होते. माधुरी नंतर कोण असे वाटू लागते तर ऐश्वर्या किंवा तशीच कोणी येते. हा खेळ अनंत आहे आणि हाच अस्तित्वाचा अर्थ आहे. 

तुम्हाला स्वरूप समजल्यामुळे अस्तित्वाला अर्थ येत नाही, तुम्हाला अस्तित्वाचा अर्थ कळतो. तुम्हाला आनंद होतो. स्वरूप समजले नाही तर तुम्ही निव्वळ धावपळीत आणि उद्विग्नतेत जगता, एवढाच फरक पडतो. सहज गाणे सुचावे तशी निराकाराला उर्मी येते आणि ह्या अस्तित्वाची  कविता निर्माण होते, तुमच्या गाणे सुचण्याला काय कारण असते? आनंद! गाण्याचा हेतू काय? मजा!

चमत्काराच्या अट्टाहसा मुळेच वैभवशाली भारतीय अध्यात्म हास्यास्पद झाले आहे. मला नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला तेंव्हाची घटना  आठवते. आपल्या एका भारतीय योग्यानी आम्ही काय चंद्रावर केंव्हाच पोचलो होतो तिथे सोनेरी माती आहे हे मी इथे बसून सांगतो असे पेपर आऊट केले (महाराष्ट्र टाईम्स मधे). झाले, सगळ्यांची नजर अमेरिकी संशोधना कडे लागली! कुठे काय? तिथे साधीच माती निघाली!  आम्ही चमत्काराच्या मागे लागलो आणि ते संशोधनाच्या मागे लागले. आम्ही कोणतीही गोष्ट सिद्ध करू शकलो नाही आणि अजून ही आम्हाला वाटते काहीतरी चमत्कार होईल आणि काहीही न करता भारत सगळ्यात महान देश होईल. चमत्काराचा हव्यास समोर असलेला निराकार दिसेनासा करतो.                 संजय