प्रत्येक मराठीभाषकालाच का, प्रत्येक माणसाला, आणि पाचच का, जमतील तेवढ्या, जेवढ्या अधिक शक्य आहेत तेवढ्या भाषा अवगत असाव्यात हे एक आदर्श म्हणून योग्यच आहे, परंतु व्यवहारात ते नेहमी शक्य असेलच असे नाही. संधीची अनुपलब्धता, वेळेची अनुपलब्धता, क्षमतेची अनुपलब्धता आणि इच्छेची अनुपलब्धता या चारपैकी एक किंवा अनेक या ध्येयाच्या आड येऊ शकतात. पैकी इच्छेची अनुपलब्धता वगळल्यास इतर कोणत्याही कारणास्तव जर कोणाला हे ध्येय गाठता आले नाही (आणि यात माझ्यासह अनेक असतील), तर ती गोष्ट अशा व्यक्तीविरुद्ध निदान मी तरी धरणार नाही.
शिवाय, एखादी भाषा शिकली तरी वापराच्या संधीच्या अनुपलब्धतेमुळे किंवा वापराची संधी मुद्दाम शोधण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या अनुपलब्धतेमुळे विसरली जाऊ शकते, ते वेगळेच.
थोडक्यात, माणसाने शिकता येतील तेवढ्या भाषा जरूर शिकाव्यात. आणि शिकलेल्या भाषा जतन करता आल्या तर उत्तमच, परंतु हे न जमणे हे पाप नव्हे. जमले नाही तरी शक्य तोवर जमवण्याची इच्छा मात्र पाहिजे. 'मला अमूकअमूक भाषा येत नाही' हे विधान परिस्थितीचे निवेदन (स्टेटमेंट ऑफ फॅक्ट) म्हणून ठीक आहे, परंतु यात अभिमानाने किंवा गर्वाने सांगण्यासारखे काहीही नाही. त्याहीपुढे, 'मी अमूकअमूक भाषा शिकणार नाही' या विधानात अभिमानाने किंवा गर्वाने सांगण्यासारखे तर काहीच नाही, आणि परिस्थितीचे निवेदन म्हणूनही ते ग्राह्य नाही.
'अमूकअमूक भाषेची/आणखी एका भाषेची/राष्ट्रभाषेची गरज काय?' हा प्रश्न 'गरज आहेच, की नसल्याने कोणाचे काही फारसे बिघडणार नाही?' अशा वाच्यार्थाने ठीकच आहे. त्यावर चर्चा होऊ शकते. परंतु 'मी अमूकअमूक भाषा शिकणार नाही' या गर्भितार्थाने (थोडक्यात, 'मला अमूकअमूक भाषा न शिकण्यासाठी / शिकण्याचे टाळण्यासाठी काहीतरी पुढे करण्याचे कारण पाहिजे, ते शोधतोय' अशा अर्थी) असल्यास या प्रश्नामागील वृत्ती निश्चितच वाखाणण्याजोगी नाही.