गेल्या अनेक वर्षातील निकालांच्या तुलनेत हा निकाल अतिशय चांगला आहे. जगात सगळीकडेच आर्थिक अरिष्टाचे वातावरण असताना त्याच्याशी सामना करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जरुरीचे असलेले स्थिर सरकार या निवडणुकांमुळे मिळावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी, चौथी, पाचवी वगैरे आघाड्यांची बिघाडी झाली हेही चांगले झाले. विशेषतः प्रत्येकच मंत्रीमंडळात शक्यतो मंत्री असणार्या रामविलास पासवानांचा पराभव ही आनंददायी गोष्ट आहे.
या निवडणुकीत भाजपाला भोवलेले मुद्दे खालीलप्रमाणे असे मला वाटते.
१. अणुकराराच्या कालखंडात अस्थिर झालेले सरकार पाडण्यासाठी मनापासून केलेले प्रयत्न. त्या मुद्द्याबाबत काँग्रेस आणि भाजपाचे धोरण साधारणपणे समान असूनही त्यांनी सहकार्य का केले नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
२. इथे आडवाणींनाच पंतप्रधान म्हणून स्वीकारण्यास देशातील जनता तयार नाही तिथे मोदींच्या नावाचा धुरळा उडवून संभ्रम निर्माण केला.
३. वरुण गांधी आणि श्रीराम सेनाच्या बाबतीत नरो वा कुंजरो वा अशी घेतलेली भूमिका.
४. मनमोहन सिंग यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका.
शिवसेना-भाजपा युती मुंबईत अगदी भुईसपाट झाली याचा मला अतिशय मनस्वी आनंद झाला आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. आज तोंड वर करुन "मराठी माणसांचे प्रश्न मुंबईत कोण विचारणार ते मनसेला विचारा" असे सांगणार्या पक्षाच्या माजी खासदारांनी मागील लोकसभेत काय दिवे लावले होते हेही सांगावे. एकनाथ गायकवाड आणि सचिन दिना पाटील हे मराठी खासदार मुंबईतून आहेतच. शिवाय कालपरवापर्यंत शिवसेनेच्याच राज्यसभेच्या तिकिटावर खासदार असलेले संजय निरुपमही आहेत. (त्यावेळी ते शिवसेनेला चालले म्हणजे त्यांना मराठी मानण्यास हरकत नसावी. नाही का? )