कटककर पंत,

माझ्या 'भूल' या गझलेवरील प्रतिसादांमधून तुम्ही मांडलेली मते (नि उडालेला धुरळा) लक्षात घेता 'गझलेची एकच मन:स्थिती' ही कवीने (/तुम्ही स्वतः) 'घालून घेतलेली' अट वाटते. गझल हा काव्यप्रकार 'स्वतःहून' तंत्रमंत्राच्या अशा कोणत्या 'अटी घालतो' आणि नज्म हा काव्यप्रकार 'स्वतःहून' तंत्रमंत्राच्या अशा कोणत्या 'अटी घालतो' हा वादाचा मुद्दा येथे पुन्हा उपस्थित न करणेच श्रेयस्कर ठरेल (त्यामुळे मी तो स्वतःहून किंवा इतर प्रतिसादांतून उपस्थित करणारही नाही; मिलिंद फणसेंनी त्याबाबत योग्य भाष्य भूल वरील एका प्रतिसादात केलेच आहे). मात्र अट आणि संकेत/प्रघात/परंपरा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि काव्यप्रकाराकडून येणाऱ्या बंधनां व संकेतांव्यतिरिक्त कवीने स्वतःहून स्वखुशीने पाळलेली/घालून घेतलेली बंधने, संकेत इ. ची जबाबदारी 'काव्यप्रकारानेच घातलेली'  म्हणून त्या काव्यप्रकारावर थोपविली जाऊ नयेत, हे लक्षात घेणे येथे अधिक श्रेयस्कर होईल; त्यानुसार अटीला अट आणि संकेत/प्रघात/परंपरा यांना अनुक्रमे संकेत/प्रघात/परंपरा म्हटले जावे, ही रास्त अपेक्षा वाटते.

जयंतराव,

गझलेच्या आकृतीबंधाच्या अटी इ. आवश्यक बाबी पूर्ण झाल्या असल्या आणि हिला सगळ्या तंत्रमंत्रादी मोजपट्ट्यांच्या आधारे गझल म्हटलेले चालेल, असे सिद्ध झाले, तरी सौंदर्य, अर्थगर्भता या पातळ्यांवर (मला) बऱ्यापैकी उणीव जाणवते आहे. चू भू द्या घ्या. लहान बहरात सौंदर्यपूर्ण, अर्थगर्भ कल्पना राबवण्याचा तुमचा पूर्वेतिहास लक्षात घेतल्यास वाचक म्हणून तुमची गझल वाचायला घेताना ज्या अपेक्षा तयार होतात, त्या अपेक्षा ही गझल फोल ठरवते असे माझे नम्र वैयक्तिक मत आहे. यात वृत्त असणे पण गझलेची वृत्ती दिसत नसणे, हा अभाव मला बऱ्यापैकी जाणवतो आहे.

याला गझल म्हणावे की नाही, या तुमच्या प्रश्नाचे ठोस उत्तर देणे मला कठीण वाटते कारण काव्यप्रकाराकडून येणारी बंधणे/संकेत, कवी स्वखुशीने पाळत असलेली बंधने/संकेत यांपैकी काव्याला/गझलेला 'गझल' म्हणताना कशाला किती वजन कसे द्यावे यांवर, गझलेची वृत्ती म्हणजे काय याबाबत कवीचे ज्ञान, जाणकारांच्या अभ्यासाशी व मतांशी फारकत असे एक ना हजार प्रश्न/वाद उपस्थित होतील. त्यामुळे मला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण वाटते. यावर प्रदीप कुलकर्णी, चित्त, मिलिंद फणसे, वैभव जोशी यांसारख्या मित्रमंडळींकडून कितपत माहिती मिळवता येईल/मिळेल, चर्चा करता येईल, याची मला जास्त उत्सुकता वाटते.

मी गझलतज्ज्ञ नाही याबाबत आणि आपण माझा हा प्रतिसाद सकारात्मकच घेणार असल्याबाबत पूर्ण खात्री आहे.