कृपया ही चर्चा समजली जावी. मी पण या मार्गावर असण्याचा फक्त प्रयत्नच करू शकत आहे. मते चुकीची वाटल्यास जरूर सांगावेत.
कविता ही एक अशी रचना समजली जावी जी मुळातच उत्स्फुर्त असते. त्यानंतर त्यात तंत्र वगैरे गोष्टी याव्यात. म्हणजे, अभंग, ओवी, गजल, लावणी, भावगीत यापैकी कुठलाही प्रकार जरी निवडला गेला ( तो निवडला जाणे हे ही नैसर्गीक व उत्स्फुर्त असते ही एक वेगळी गोष्ट!) तरीही त्यातील आशय व शब्दरचना या दोन्ही गोष्टी उत्स्फुर्तपणे सुचतात हे मान्य व्हावे.
पुष्ट्यर्थ एक मुद्दा मांडून पाहत आहे.
समजा एका गजलकाराने वर्षात फक्त ३ गजला केल्या अन प्रत्येक गजल सुचायला त्याला जर दोन दोन महिने लागले, तर विविध शेरांमधील त्याची मनस्थिती ही वैविध्ययुक्त असणे साहजिक आहे. जून महिन्यात त्याला ऐश्वर्या राय अतिशय सुंदर असल्याचा साक्षात्कार होईल तर सप्टेंबर महिन्यात त्याला लालूप्रसाद यादव यांनी फारच भ्रष्टाचार केला हे जाणवेल.
मग एक शेर होईल सौंदर्यावर, एक होईल भ्रष्टाचारावर!
अगदी तंत्र वगैरे सर्व व्यवस्थितपणे पाळून!
( यात मी गजल किंवा कुठलीही कविता करण्याची वारंवारता किती असावी याबाबत लिहीत नाहीये हे कृपया नोंदीत घ्यावेत. )
ही गजल आहेच याबाबत कुणीही 'ब्र'ही म्हणू शकणार नाही.
परंतू, ती फक्त तांत्रिकदृष्ट्या गजल आहे असे माझे मत आहे. शतकानुशतके 'गज़ल' या काव्यप्रकारात जे चालत आले आहे त्यातून तसे दिसत आहे. गजलेमध्ये तंत्रासहितच आशयाला, उत्स्फुर्ततेला व मनस्थितीच्या सातत्याला महत्त्व द्यायला हवे असे माझे नम्र मत आहे. ही फक्त चर्चाच आहे, तेव्हा दुराग्रहाने मत नोंदवले असे कृपया वाटून घेऊ नये.
आपण मीर, गालिब, मोमीन, मजाज, जिगर ( उगाच माहीत आहे म्हणून नावे घेत आहे असे मानू नयेत ) यांची शायरी जर वाचलीत तर कुठल्याही गजलेमध्ये मुळात एक 'विशिष्ट मनस्थिती' असते.
अहमद फराज यांची ही एक रचना:
आँखसे दूर न हो दिलसे उतरजायेगा
वक्त का क्या है गुजरता है गुजरजायेगा
इतना मायूस ना हो खिल्वते गमसे अपनी
तू कभी खुदकोभी देखेगा तो डरजायेगा
तुम सरे राहे वफा देखते रह जाओगे
और वो बामे रफाकतसे उतरजायेगा
डुबते डुबते कश्ती को उछाला दे दू
मै नही कोइ तो साहिलपे उतरजायेगा
आणखीही काही शेर आहेत बहुधा यात!
पण प्रत्येक शेर हा एकच मनस्थिती दर्शवतो असे वाटत आहे.
आता, जर 'मनस्थितीतील सातत्य ठेवायचेच नाहीये' किंवा 'ठेवले पाहिजे असे काहीही नाही' असा मुद्दा असेल, तर ते स्वातंत्र्य आहेच, पण त्या काव्यप्रकाराला काय म्हणायचे याबाबतही मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य असणार!
मनस्थितीतील सातत्य ठेवण्यासाठी एकाच मनस्थितीत असताना जीवनाच्या विविध पैलूंवर मतप्रदर्शन करणे आवश्यक होते. नैसर्गीकरीत्या मानवाची मनस्थिती एकाच प्रकारची साधारण ४ ते ५ तास किंवा थोडी अधिक काळ राहू शकते. याचे कारण, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी सतत विविध परिणाम होत राहतात व मनस्थिती बदलू शकते. ( काहींच्या बाबतीत आयुष्यभर तीच मनस्थिती राहणे अशक्य नाही, पण त्यातही बारकावे पाहिल्यास असे आढळावे की कधी तो आनंदी होता, कधी मोहात होता, कधी दुःखी होता, कधी अपमानित होता वगैरे वगैरे! ) यातूनच, कविता रचतानाची उत्स्फुर्तता महत्त्वाची ठरावी.
मानस ६ यांचा एक मिसरा इथे देतो - कैक मतले ... फक्त पडलेले
अशी अवस्था सर्वच गजलकारांची होत असणार. एखादा शेर सुचला, पुढे काहीही रचावेसे वाटले तरी नाही किंवा सुचले तरी नाही. यातील 'सुचले तरी नाही' हे फार महत्त्वाचे आहे. 'त्याच पातळीचे' सुचले नाही ही त्यातील व्यथा असते. म्हणजेच, 'त्याच मनस्थितीत' आणखी काहीही रचावेसे वाटले नाही. त्यानंतर तश्या स्वरुपाची मनस्थितीच झाली नाही. ( अर्थात, मानस ६ यांनी ती गजल पूर्ण केली आहे, म्हणजेच, तीच मनस्थिती सांगणे हे त्यांच्या गजलेचे उद्दिष्ट होते ).
खालील शेर पहाः हे माझे जुने शेर मुदाम या चर्चेसाठी म्हणून लिहीत आहे. ( अर्थातच, शेर सामान्य आहेत हे मान्य आहे. )
बारा महिने डोळ्यांना पाझर फुटतो मोत्याचा
तुझ्यासारखा नाही मी सणासुदीला नटणारा - प्रेमातील अपयशाची भावना - निगेटिव्ह!
'अता सोड की' म्हणताना, घट्ट मला ती बिलगे का?
तिचाच मुद्दा बहुधा तो, तिला नसावा पटणारा - पॉझिटिव्ह भावना!
एकाच गजलेत हे दोन शेर असणे हे अयोग्य आहे असे माझे मत आहे. त्यांना स्वतंत्र्यरीत्या अर्थ जरूर आहे, पण फक्त तीच एक अट असावी यापेक्षा, एकाच मनस्तितीमध्ये विविध विषयांवर लिखाण करणे हे जास्त बंदिस्त व रंजक ठरावे. तसेच, तेच होतही आले आहे. त्यामुळेच खरे तर, हा काव्यप्रकार इतका टची झाला असावा.
ही सर्व वैयक्तिक मते असून, मीही माझ्या गजलांमध्ये पूर्णपणे पाळण्यात यशस्वी झालो आहे की नाही हे नक्की सांगता येणार नाही. पण सध्या अशी मते आहेत, त्यानुसार चालत आहे.
आपली मते समजल्यास बरे वाटेल.