गोडबोले चा क्लू ओढूनताणून आणलेला वाटला. कुणाला आवडतो तर... कुणाला आवडत नाही![]()
क्रिप्टिक क्लू प्रकाराची हीच तर खासियत आहे! ते ओढूनताणून असण्याचा प्रघात आहे. किंबहुना, ते ओढूनताणूनच असावेत; त्यातूनच सोडवणाऱ्याचे कौशल्य पणास लागते. ती एक बौद्धिक मेजवानी असते. (जितके ओढूनताणून तितके चांगले.)
इंग्रजी (म्हणजे इंग्लंडमधील) वर्तमानपत्रांतील क्रिप्टिक शब्दकोडी सोडवली आहेत कधी? साधारणतः बारा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेससारखी अग्रगण्य भारतीय इंग्रजी दैनिके रोजची क्रिप्टिक शब्दकोडी कोठल्या ना कोठल्या ब्रिटिश दैनिकातून (अर्थात पूर्वपरवानगीने आणि पूर्वनियोजनाने) उचलून छापीत. एकाहून एक ओढूनताणून क्लू असत. सोडवायला मजा येत असे. आणि तिरकस बुद्धीला धार लावायलाही चांगली संधी मिळत असे. बऱ्यापैकी कठीण प्रकार असे. (दोनतीन तासांच्या झगडपट्टीनंतर साधारणतः दोन ते तीन टक्के शब्द जमले तरी भयंकर आनंद होत असे. आणि एखादे दिवशी चुकून दहा टक्क्यांपर्यंत शब्द जमले, तर लॉटरी लागल्यासारखे वाटत असे. कॉलेजच्या दिवसांत हॉस्टेलवर पडल्यापडल्या चांगला टाइमपास असे. आणि नंतर मुंबईतील नोकरीच्या दिवसांत कधी जमले तर एक हात दरवाजातील उभ्या दांडीभोवती वेढून त्याच हातात टाइम्सचे केवळ शब्दकोड्याचे पान आणि दुसऱ्या हातात पेन अशा अलौकिक अवस्थेत लोकलला लटकत ते कोडे सोडवत जाण्याची मजा काही औरच असे.)
हल्ली भारतीय इंग्रजी दैनिके शब्दकोडी कोठून उचलतात याची कल्पना नाही, परंतु ब्रिटिश दैनिकांतून खचितच नसावेत. त्याऐवजी हल्ली अत्यंत पाणीदार शब्दकोडी छापून येतात. ती सोडवण्यात मजा येत नाही. आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत बऱ्याच ब्रिटिश दैनिकांच्या ऑनलाइन आवृत्तींतून शब्दकोडी उतरवून घेता येत असत, पण हल्ली त्यासाठी वर्गणी भरून सभासद व्हावे लागते. (गेले ते दिवस! )
दुर्दैवाने अमेरिका क्रिप्टिक शब्दकोड्यांच्या वाटेला कधी गेलीच नाही. त्यामुळे त्या बाबतीत येथे आनंदीआनंद आहे.
प्रस्तुत कोड्यातील 'गोडबोले'चा क्लू माझ्या लेखी एक उच्चप्रतीचा क्रिप्टिक क्लू ठरावा.