वर चर्चा-प्रस्तावात उल्लेखलेली 'बातमी' देऊन जेमतेम १८ दिवस झाले असताना आज, २०-०५-०९ रोजी लोकसत्तेत ''संगणकीय मराठीच्या प्रमाणिकरणाची आवश्यकता" ही नवी (!? ) 'बातमी' नीरज पंडित नामक वार्ताहराने दिली आहे.

पंडित लिहितात, "मध्यंतरीचा काळात मायक्रोसॉफ्टच्या ‘युनिकोड’ने या संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, पण भाषेची गरज पूर्ण भागविण्यात हा फॉण्टही अपुराच ठरला, असे काही जणांचे *म्हणणे असून त्यात काही प्रमाणात तथ्य आहे."
हे 'काही जण' कोण हे सुज्ञांस सांगणे न लगे.

"गांगल यांच्या मते आजपर्यंत उपलब्ध असलेले मराठी फॉण्ट मराठी भाषेशी साधर्म्य साधणारे नाहीत. हे सर्व फॉण्ट इंग्रजांनी लादलेल्या प्रिटींग टेक्नॉलॉजीला आवश्यक अशा ‘डिटीपी’ तंत्राला उपयुक्त असे बनविण्यात आले आहे. यामुळे या फॉण्टस्मध्ये मराठी भाषेतील जातीगुण वैशिष्ट्ये सापडत नाहीत."
'मराठी भाषेची साधर्म्य साधणारे नाहीत' मग काय तुळुशी साधर्म्य साधणारे आहेत? आणि 'या फॉण्टस्मध्ये मराठी भाषेतील जातीगुण वैशिष्ट्ये सापडत नाहीत'  म्हणजे नक्की काय हे कोणी मनोगती या पामराला सोप्या शब्दांत सांगेल काय ( कारण गांगल सांगणार नाहीत हे निश्चित) ?

"गांगल यांचा फॉण्ट कीबोर्डवरील ९४ चाव्यांमध्ये बनविण्यात आला असून तो आपण कागदावर ज्याप्रमाणे लिहितो त्याप्रमाणे चालतो. म्हणजे ‘अ’ हे अक्षर लिहिण्यासाठी आपण किमान दोनदा पेन उचलतो त्याचप्रमाणे ‘एसगांगल’ फॉण्टमध्ये संगणकावर हेच अक्षर टाइप करण्यासाठीही आपल्याला दोन चाव्यांचा वापर करावा लागतो."
मुळात संगणकाचा फॉण्ट कागदावर आपण लिहितो तसाच का चालावा ?  काय आणि कसे उमटते ते महत्त्वाचे. 'अ' अक्षर टंकण्यासाठी युनिकोड व बहुतेक सर्व प्रोप्रायटरी फॉण्टस्मध्ये केवळ एक कळ दाबावी लागते, एसगांगलमध्ये दोन, हा एसगांगल फॉन्ट वापरण्याचा तोटा ठरतो असे मला तरी वाटते. त्यास पंडित व पर्यायाने गांगल फायदा ठरवू पाहत आहेत.

"तसेच गांगल यांच्या या फॉण्टमध्ये प्रत्येक अक्षराचे स्वतंत्र अस्तित्व जाणवते. "
अरे देवा, हे आहेच का? ह्याविषयी वर चर्चा-विषयात लिहिले आहे.

"या फॉण्टचे विशेष म्हणजे हा आपण सहज इमेलद्वारे कोणालाही पाठवू शकतो."
कोणताही फॉन्ट इमेलद्वारे पाठवता येतो, हे काही गांगल फॉन्टचे वैशिष्ट्य नाही.

"शिवाय हा फॉण्ट वापरण्याठी इतर मराठी फॉण्टप्रमाणे आपल्याला विशिष्ट एकाच प्रकारचा ‘कीबोर्ड’ वापरण्याची गरज नसते. आपल्या सवयीचा कीबोर्ड तयार करण्याची सोय ‘एसगांगल’ फॉण्ट मध्ये आहे. उदा. आपल्याला ‘ए’या की वर ‘अ’, ‘बी’ या की वर ‘ब’ किंवा अजून काही अपेक्षित असेल तर त्याप्रमाणे कीबोर्ड तयार करता येणे शक्य असल्याचे गांगल यांनी स्पष्ट केले आहे."
कीबोर्ड मॅपिंगची सुविधा सर्व संगणकांमध्ये असते असा माझा समज होता. तज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा.

"‘गांगल’ या फॉण्टमध्ये मराठी मजकूर टाईप करून तो मजकूर आपण सिलेक्ट करून त्याला ‘गांगलआर’ या फॉण्ट मध्ये रुपांतर केल्यास तो इंग्रजी होतो. उदा. आपण ‘बॉल’ हा शब्द ‘गांगल’मध्ये टाइप केला नंतर तो शब्द ‘गांगलआर’मध्ये रूपांतरित केल्यास तो शब्द kballl असा दिसतो. याद्वारे गांगल यांनी ‘लिप्यांतरणाचे’ नवे रूप सर्वासमोर ठेवले आहे."
अगदी बरोबर! जे लिप्यंतर 'बॉल' चे रूपांतर 'kballl'  असे करते ते नवे, किंबहुना, अत्याधुनिकच म्हणायला हवे कारण जुने-पुराणे टाकाऊ लिप्यंतर त्यास 'ball' करून गप्प बसले असते.

"येणाऱ्या काळात राज्यातील विविध बोली भाषेतील साम्य साधून त्याद्वारे नवी प्रमाणित मराठी तयार करण्याचा ध्यास गांगल यांनी घेतला आहे."
मराठी भाषा ही साऱ्या मराठी भाषकांची आहे असा माझा गोड गैररसम होता. ती कोणीतरी गांगल ह्यांना विकली अथवा आंदण दिली आहे हे ठाऊक नव्हतं. "नवी प्रमाणित मराठी" तयार करण्याचे सर्वाधिकार त्यांना कोणी दिलेत? त्यांचे फॉन्ट्स् त्यांची निर्मिती आहेत, त्यांचे ते काहीही करू शकतात, परंतु मराठी भाषा दहा कोटी मराठीजनांची आहे. 'पण लक्षात कोण घेतो'?

"राज्याला फुकटात मराठी फॉण्ट अर्पण करणारे गांगल हे मर्चंट नेव्हीमध्ये सेवेत होते. त्याकाळातील त्यांनी जमवलेली सर्व पुंजी ते संगणकीय जगतात मराठी श्वास टिकविण्यासाठी खर्च करीत आहेत."
संगणकीय जगात मराठी श्वास गुदमरतोय हा जावईशोध गांगल ह्यांना कसा लागला? गेल्या काही वर्षात शासकीय कारभारात युनिकोडमुळे संगणकावर मराठीचा वापर बराच वाढला आहे.  जालावर मराठीने चांगलेच बाळसे धरले आहे ह्याची साक्ष द्यायला अनेक जालचावड्या व शेकडो मराठी अनुदिन्या आहेत. मराठीत इ-मेल सर्रास लिहिल्या-वाचल्या जातात. तेव्हा गांगलसाहेब, नका तुमची पुंजी उगीच खर्च करू. भीक नको पण कुत्रा आवरा.

"शासनाने युनिकोड आणून मराठीला संगणकाच्या अंतर्भागात जागा मिळवून दिली खरी. पण याची खरी कसोटी लागणार आहे ती जेव्हा ऍप्लिकेशन्स बदलतात तेव्हा. म्हणजे विंडोज-९५ची जागा विंडोज-९७ ने घेतली. अशा प्रकारे ऍप्लिकेशन्स बदलत जातात. आता एक्सपी आणि विस्टा बाजारात आहेत पण येण्याऱ्या काळात हे ऍप्लिकेशन पुन्हा अपडेट होईल आणि पुन्हा एकदा युनिकोडच्या अस्तित्वावर प्रश्नचिह्न उभे राहणार आहे."
??? विंडोज-९७ म्हणजे रे काय, भाऊ?   ? विंडोज-९५, विंडोज-९८, एक्सपी, व विस्टा ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्स आहेत असा माझा समज होता! पंडितांना जर ऍप्लिकेशन्स व ऑपरेटिंग सिस्टिम्स ह्यातील फरक माहीत नसेल तर त्यांनी अशा प्रकारचे तांत्रिक विषयांवरील लेख एक तर लिहू नयेत किंवा लिहिल्यास एखाद्या जाणकाराकडून तपासून घ्यावेत ही एक वाचक म्हणून माझी नम्र सूचना आहे. बाकी, युनिकोडच्या अस्तित्वावर प्रश्नचिह्न कसे उभे राहणार आहे असले नाठाळ व पाखंडी प्रश्न न विचारलेलेच बरे, कारण उत्तरे मिळण्याची शक्यता धूसर आहे.

"तसेच युनिकोडसाठी केंद्र सरकारने भरपूर पैसे मायक्रोसॉफ्टला दिले आहेत."
ह्याविषयी मला काही माहीत नाही. इथे कोणास ठाऊक असल्यास सांगावे.

"पूर्णतः: मोफत असणारा भारतीय बनावटीचा मराठीशी आपलेपण जपणारा फॉण्ट शासनाने का मान्य करू नये असा सवाल गांगल यांनी केला आहे. थोडक्यात संगणकीय मराठीचे प्रमाणीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे."
एरियल युनिकोड फॉन्ट मोफतच आहे. आणि मराठीशी आपलेपण जपणारा फॉन्ट म्हणजे काय हे गांगल स्पष्ट करतील काय? इतर फॉन्ट्स काय मराठीला लाथा मारत असतात? संगणकीय मराठीच्या प्रमाणीकरणाची गरज युनिकोडने बहुतांशी भागवली आहे. ज्या काही त्रुटी आहेत त्याही कालांतराने तज्ज्ञांकरवी दूर केल्या जातील. प्रमाणीकरणासाठी पुन्हा कालचक्र उलटे फिरवून प्रोप्रायटरी फॉन्ट्सच्या मागास युगात जाण्याची आवश्यकता नाही.

शेवटी, मला हल्ली नेहमी पडत असलेला एक प्रश्न तुम्हा सर्वांपुढे ठेवतो. लोकसत्ता दैनिक गांगलांवर इतके मेहेरबान का?