मला वाटते, अर्थछटांचा विचार केल्यास ढोबळमानाने आदर हा रिस्पेक्टच्या अधिक जवळ जातो, व मान ऑनरच्या. (अवांतर : ढोबळमानाने अर्थछटांचा विचार करणे ह्यात विरोधाभास जाणवतो का? )
    शब्दप्रयोगाविषयी बोलायचे झाल्यास मराठीत आदर असतो व मान दिला जातो. आदर देणे वा करणे असे शब्दप्रयोग मराठीत वापरले जात नसत. आदर तेव्हाच केला जातो जेव्हा त्यास आणखी एखादा शब्द जोडला जातो, जसे आदरातिथ्य करणे, आदरसत्कार करणे.
    अशा ह्या सूक्ष्म फरकात प्रत्येक भाषेचे वैशिष्ट्य, वेगळेपण व त्या भाषक समुहाची शेकडो वर्षांची मौखिक परंपरा व संस्कृती दिसून येते. दुर्दैवाने आजकाल 'काय फरक पडतो' ह्या वृतीमुळे हे वेगळेपण झपाट्याने लोप पावत आहे. विस्मृतीत जाणारी प्रत्येक अर्थछटा आपल्या अभिव्यक्त होण्यावर मर्यादा आणत असते, तरलता व भाव-भावनांतील छोटे छोटे फरक दर्शवण्याची आपली क्षमता घटवते आणि आयुष्यातील, संवादातील, विचारांतील सूचकतेची, न्यूआन्सेसची (पहा, इथेही योग्य मराठी शब्द न सुचल्यामुळे इंग्रजीच्या कुबड्या घ्याव्या लागल्या!) जागा बटबटीतपणा, ढोबळपणा व ल‌.सा.वि.कीकरण घेतात.
    यापुढे हिंदीच्या व इंग्रजीच्या झंझावातांपुढे मराठी भाषेची वेगळी प्रकृती टिकेल की नाही ही भीती वाटते. मराठी वाहिन्यांवर व मराठी वृत्तपत्रांत वापरली जाणारी मराठी भाषा ह्याची साक्ष देण्यास पुरेशी आहे. उदाहरणार्थ, हल्ली एखाद्याला मदत केली जात नाही तर एखाद्याची मदत केली जाते.