आता सांगा विरोध करायचा नाहीतर नक्की काय करायचे?
दुर्लक्ष?
मला एक समजत नाही, की अर्धवट माहिती आणि अर्धवट समज यांच्या आधारावर मांडल्या जाणाऱ्या एका व्यक्तीच्या विचित्र कल्पनांना कडाडून विरोध करण्यात आपण एवढी शक्ती खर्च का करतोय?
अर्धवट माहितीवर आपल्याला न कळणाऱ्या किंवा केवळ वरवर कळलेल्या विषयांवर लिहिलेले (विशेषतः तांत्रिक विषयांवरील) वैचित्र्यपूर्ण लेख मराठी वृत्तपत्रसृष्टीस नवीन आहेत काय? असे लेख आणि अशी कच्ची मडकी तर कितीतरी सापडतील, सापडतात.
आजकाल मराठी वृत्तपत्रांतील लेखांना गंभीरपणे कोण घेतो? (हल्ली भारतीय इंग्रजी वृत्तपत्रांची परिस्थितीही याहून फारशी वेगळी नाही, हा भाग निराळा. 'कालाय तस्मै नमः' म्हणतात, तेच खरे! किंवा राष्ट्रभाषेत 'ज़माना बदल गया है।')
अशा लेखांना, कल्पनांना विरोध करून त्यांचे नसलेले महत्त्व नको तितके वाढवले जाते असे वाटत नाही काय?
गांगलांना कडाडून विरोध केला नाही, तर त्यांच्या खटपटींतून नेमके काय निष्पन्न होणार आहे आणि त्यांच्या तथाकथित कल्पनांना व्यापक सामाजिक पातळीवर कितपत गंभीरपणे घेतले जाणार आहे, हे शंकास्पद आहे. मग विरोध करून त्यांचा भाव फुका का वधारायचा?
तुलनात्मक उदाहरण म्हणून सावरकरांनी सुचवलेल्या सुधारणा घेऊ. (सावरकरांची आणि गांगलांची तुलना होऊ शकत नाही हा भाग वेगळा. तशी तुलना करण्याचा उद्देशही नाही.) सावरकरांच्या काळातील छपाईतंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता त्यांनी सुचवलेल्या लिपीसुधारणा समजण्यासारख्या, उपयुक्त, रास्त आणि कदाचित स्तुत्यही होत्या असे म्हणता येईल. परंतु किर्लोस्कर प्रेस*सारखे काही थोडे अपवाद वगळता त्यांची फारशी कोणी अंमलबजावणी केल्याचे किंवा त्यांना फारसे गंभीरपणे घेतल्याचे दिसत नाही, आणि व्यापक पातळीवर छपाईमध्ये जुनी लिपी आहे तशी आजतागायत चालू आहे. (*किर्लोस्कर प्रेसनेसुद्धा सावरकरांच्या लिपीसुधारणेबद्दलच्या सूचनांची अंमलबजावणी केवळ अंशतःच केल्याचे दिसते.) सावरकरांच्या सूचना रास्त असूनही एकंदरीत त्यांच्याकडे दुर्लक्षच झाले. सावरकरांसारख्याची जेथे ही गत, तेथे गांगलांना कोण विचारतो?