मला असं वाटतं की इंग्रजीपेक्षाही मराठीत आदर आणि मान या दोन शब्दांचं (अतिशय सूक्ष्म फरकानं पण) स्वतंत्र स्थान आहे. म्हणजे उदाहरणार्थ गाडी चालवताना सिग्नलचा मान ठेवला पाहिजे. याचा अर्थ सिग्नलप्रती आपल्याला आदरयुक्त भावना असण्याचं काहीच कारण नाही. किंवा राष्ट्रध्वजाचा आपण मान राखतो. तिथे आदराची भावना नसते. म्हणजे अनादराची असते असं काही नाही. कसलीच नसते पण तरीही मान राखला जातो. म्हणजे अशा प्रकारच्या वापरात मान आणि आदर हे एकमेकांपासून स्वतंत्र असतात. पण इंग्रजीत मात्र 'यू शुड रिस्पेक्ट ट्राफिक लाईट किंवा नॅशनल फ्लॅग' असंच म्हणतात.
पण हेच एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत बोलताना मात्र हे दोन्ही शब्द एवढे स्वतंत्र नसतात. इथे मान हा शब्द आदराच्या सबसेट सारखा वापरला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आदर वाटला तरच तिचा योग्य मान ठेवला जातो. आदरच नसेल तर मान ठेवला जाईलच असं नाही. त्यामुळे मान आदरावर अवलंबून असतो म्हणावं लागेल. पण इंग्रजीत मात्र असा आदर आणि मान हा फरक व्यक्तिच्या बाबतीत बोलताना केलेला आढळत नाही, असं मला वाटतं. चू. भू. दे. घे.