ऋ हे अक्षर अ‍ृ ह्या अक्षराचे अपभ्रष्ट/संस्कारित रूप असावे. अ‍ृ हे थोडे थोडे बदलत गेले (किंवा मोडीतल्या सारखे धावते, घाईघाईने काढत गेले! ) तर ऋ पर्यंत पोहोचलेले नैसर्गिक वाटते.

याबाबत मला शंका वाटते.

देवनागरी ही लिपी मराठीव्यतिरिक्त हिंदी आणि हिंदीच्या उपभाषा (डायलेक्टस अशा अर्थी. जसे, राजस्थानी, हरयाणवी किंवा उत्तरप्रदेशातील विविध हिंदीसदृश भाषा वगैरे. यांना 'बोली' हा शब्द नेमका वापरावासा वाटत नाही.), नेपाळी भाषा आणि नेपाळमधील इतरही काही भाषा, तसेच काही प्रमाणात* संस्कृत, पंजाबी, सिंधी आणि कोंकणीसाठीसुद्धा वापरली जाते. देवनागरीच्या या सर्वच अवतारांत ऋ हे अक्षर (जेव्हा वापरण्याची वेळ येते तेव्हा) सारखेच लिहिले जात असावे असे वाटते.

ऋ हे अक्षर अ‍ृ या अक्षराच्या अपभ्रंशाने तसे बनले असते तर एवढ्या व्यापक प्रदेशात हा अपभ्रंश जसाच्या तसा पसरला असता का याबद्दल थोडा साशंक आहे.

*संस्कृत ही भाषा सर्व ठिकाणी आणि सर्व काळी देवनागरीत लिहिली जात नसावी असे वाटते. पंजाबी ही भाषा स्वतंत्र भारतात गुरुमुखीत आणि पाकिस्तानात उर्दू लिपीत असे प्रमाणीकरण होण्यापूर्वी पंजाबीभाषक हिंदू समाजात काहीजणांत प्रघाताने देवनागरीत लिहिली जात असे असे ऐकलेले आहे. सिंधी भाषेसाठी अधिकृतरीत्या किंवा प्रघाताने वापरल्या जाणाऱ्या विविध लिप्यांपैकी देवनागरी हीसुद्धा एक लिपी आहे. कोंकणी ही भाषा विविध प्रदेशांत आणि समाजांत प्रघाताने देवनागरी, रोमन किंवा कन्नड लिपी वापरून लिहिली जाते.