तसेही अि, अु, अे या अक्षरांसाठी वरील जो आक्षेप आहे, तोच आक्षेप आ आणि ओ या अक्षरांसाठीही लागू होण्यासारखा आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु आ आणि ओ ही अक्षरे संकेताने सर्वमान्य असल्याकारणाने तसा आक्षेप घेतला जात नाही.
'इ'च्या डोक्यावरची वाकडी शेंडी तिला दीर्घ ई बनवते, 'उ'च्या पाठीमागे एक कुत्र्याची शेपटी जोडली की ऊ होतो. तद्वतच 'अ'ला एक अधिकचा स्वरदंड(काना नव्हे)जोडला, की 'आ' म्हणजे संस्कृतातला दीर्घ 'अ' होतो. या दीर्घ 'अ'ला ए चा शेपटा लावला की ओ. हलन्तचिन्ह काढून टाकलेल्या एखाद्या व्यंजनाला आ-ई-ऊ-ए-ऋ चे विशिष्ट अवयव(फ़ीचर्स), म्हणजे वाटी, शेपटी, शेपटा इ. जोडले की त्या व्यंजनाची बाराखडी सुरू होते. तिथे त्या अवयवांना काना, वेलांटी, उकार, मात्रा, ऋकार वगैरे म्हणतात. यावरून आ, ओ ही 'अ'च्या बाराखडीतली अक्षरे नाहीत हे लक्षात यावे. यामुळे 'अृ' पासून ऋ नाही तर ऋ पासून अृ झाला आहे.
अवान्तर:--देवनागरीत 'र' सोडून सर्व अक्षरांना एक स्वरदंड आहे. (र् साठी म्हणूनच सावरकरांना स्वरदंड हवा होता!) काहींचे स्वरदंड छोटे आहेत, काहींचे मोठे. ज्यांना सुट्टा स्वरदंड आहे अशी आ, ग, ण आणि श ही चारच अक्षरे आहेत, आणि अशा तीनही सुट्या स्वरदंड असलेल्या तीन अक्षरांनी बनलेला 'गणेश' हा मराठीतला एकुलता एक शब्द आहे.