मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही परंतु सिनेमा आला त्यावेळेस गाण्यांच्या कॅसेटप्रमाणेच याची डायलॉगची कॅसेटही मिळायची. ती कॅसेट लहानपणी मी कित्येकदा ऐकली आहे. त्यात जेव्हा अलका कुबलचे लग्न होते तेव्हा ती वडिलांचा आशीर्वाद घ्यायला येते आणि वडील तिच्याकडे पाठ फिरवतात त्यावेळेस ती म्हणते.." मला एकदा बेटी म्हणून हाक मारा" ..पण वडील शांत. मग म्हणते..." नाही द्यायचा आशीर्वाद नका देऊ,नाही म्हणायचं बेटी नका म्हणू पण एक मागणं आहे.‍  मेल्यानंतर माझ्या अंगावर माहेरची साडी घालायला विसरू नका" मला दरवेळेस हा संवाद ऐकला कि प्रश्न पडायचा' हिला कसं माहित बरं आपण वडिलांअगोदर मरणार आहोत ते ? ' शेवटी मी माझ्या काकांना विचारलं..ते म्हणाले" त्याच्या दिग्दर्शकाला/सिनेमा बनवणाऱ्याला विचारावे लागेल...' हे काही माझ्या गळी उतरलं नाही तेव्हा. नंतर कळायला लागलं तेव्हा कुठे समजलं. आणि आज परत एकदा आठवलं....