विडंबन मूळ जमीन वापरून करतात - मान्य आहे.

मी हवी ती विशेषणे लावू शकतो - हे आपले म्हणणे योग्य आहे. परंतु माझे प्रतिसाद थेट छापून येत नाहीत व मी समोर आलेल्या रचनेला 'एक स्वतंत्र रचना' ( विडंबन असले तरीही ) असे पाहून माझे मत मांडतो. आपण ती विशेषणे बिरुदे म्हणून मिरवता या आपल्या उपरोधिक विधानाबद्दल मला आदर आहे. ( पुलस्ती व माझे कोणतेही हितसंबंध असू शकत नाहीत व त्यामुळे मी 'या गजलेचे विडंबन करू नये' असे म्हणालोही नव्हतो. ती रचनाच मुळात चांगली होती. कितीही झाले तरीही वाचक अशी विडंबने वाचून कुठेतरी मनात मूळ रचनेवर विनोद झाला याच दृष्टीने हसत असतात. )

आता पहाः

मूळ शेरः वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
          टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता

कविता सुचणारा 'वेडा' आहे, क्षण 'वेडा' आहे व कवितेने सुखे टाळून दु:खात राहण्याचे पसंत तरी केले आहे किंवा कवीला दुःखात तरी ठेवले आहे. हे 'कवितेसंदर्भात' एक व्यक्तीकरण आहे. कविता वास्तवात कशी असते हे सांगीतले गेले आहे.

आपला शेरः वेड्या समान लिहितो तासात सात कविता
             टाळू कसे कळेना, होते प्रपात कविता

ही वैयक्तिक टीका असावी असे सहज वाटते. कुणीतरी उद्योग नसल्याप्रमाणे ढीगाने कविता पाडत आहे असे हे विधान आहे. यात मूळ जमीन वापरण्यातील काहीही 'फायदा' घेतला गेलेला नाही. समजा आपण असे जाहीर केलेत की 'कविता' म्हणजे 'मनसे' आहे, तर शिवसेनेला टाळून ते निवडणुकीत वेगळे उभे राहिले अन दुःखी झाले ( किंवा शिवसेनेचे तसे झाले वगैरे ) हे विधान विडंबनात्मक होईल. विडंबन व्यक्तीचे न करता चुकीच्या गोष्टींचे किंवा सर्वांना माहीत असलेल्या विषयाचे करावे असे एक मत मी नम्रपणे मांडतो. ( बाय द वेः ही द्विपदी जर माझ्यावरच असली तर मात्र मी दिलखुलासपणे हसलो होतो हे मान्य करतो. )
---------------------------------------------------------------------------------------------

मूळ शेरः   "फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
             तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?

कवीला उत्स्फुर्तपणे सुचलेली ओळ, किंवा सध्या सुपीक असलेली प्रतिभा, या जगाच्या रहाटगाडग्यातून थोडासा मोकळा होईन तेव्हा आपल्यात राहील ना याची चिंता आहे. हे कवितेवरचे निस्सीम प्रेम आहे. किवा, ही कविता उतरवून काढावी अशी एक तीव्र उर्मी आहे, जी आत्ता रोखावी लागत आहे.

आपला शेरः फुरसत मिळेल तेव्हा कविता लिहीत असतो
            कार्यालयात लिहितो, लिहितो घरात कविता

ही वैयक्तीक टीका आहे हे लहान मुलगाही सांगेल. परत, मूळ जमिनीचा 'फायदा' घेऊन काहीच सांगीतले गेले नाही तर चार आठ जणांना हासता यावे हा एक हेतू दिसत आहे. माझ्यामते या आपल्या द्विपदीने ( ती कुणालाही उद्देशून असो), पण अपमान झाला आहे तो मूळ द्विपदीचा!
-----------------------------------------------------------------------------------------------

मूळ शेरः    गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
            जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता ( या शेराबाबत मी काही म्हणत नाही. )

आपला शेरः गझला नव्या दमाच्या जाणा कशा लिहाव्या
            जमवा जरा कवाफी; पाडा दमात कविता ( ही द्विपदी एक सामान्य विधान आहे. )
--------------------------------------------------------------------------------------

मूळ शेरः   उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
           राहील काय त्याही नंतर जगात कविता?

कवितेकडून कवीची जी मूळ अपेक्षा असायला पाहिजे ( व त्यातून जगाची कवीकडून ) ती अशी की कवितेने स्वतःचा, विश्वाच्या निर्मीतीचा व एकंदर सृष्टीचा शोधे घेऊन काही अशी प्रमेये निर्माण करावित जी इतरांना जगण्यासाठी एक दृष्टिकोन देतील. उदाहरणार्थः समजा तुकारामांनी कुठे म्हंटले असेल की माल उधार दिला काय अन पैसे घेऊन दिला काय, जे निसर्गात निर्माण होते ते सगळ्यांचेच आहे, तर एखाद्या अध्यात्ममार्गातील माणसाला ती ओळ एक दृष्टीकोन देईल. पुलस्तींच्या वरील द्विपदीमधे जो प्रश्न करण्यात आल्यासारखा वाटत आहे तो हा की सगळेच शोध लागल्यावर व सगळ्यांनाच सगळे ज्ञान मिळाल्याव्र कवितेची आवश्यकता राहील काय? एक अत्यंत सुंदर शेर म्हणता येईल हा!

आपला शेरः संपून सर्व जेव्हा जातील काफिये ते
            लिहिशील काय त्याही नंतर वह्यात कविता?

हा शेर पुन्हा फक्त मुळ शेराचा अपमान करत आहे. हा आपला शेर उद्देशून कुणालाही असो, पण तो मूळ शेराला इतक्या हीन पातळीवर आणत आहे की याला हसणाऱ्यांना कविताक्षेत्रातील अर्भके म्हणावे लागेल. ( पुन्हा, ही एक वैयक्तिक टीका आहे हे आपल्यालाही मान्य व्हावे. )
-------------------------------------------------------------------------------------------------

मूळ शेरः   कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
           कळलीच पाहिजे का एका दमात कविता?

व्वा! या आधीच्या शेराचेच एक छोटे व्हेरिएशन मानता येईल असा हा शेर आहे. वेगळा अर्थही आहेच.

आपला शेरः कळते अजून कोठे माझी मलाच कविता
            कळण्यास का लिहावी आम्ही मुळात कविता

बालवाडीतील मुले करतात तसा हा विनोद वाटत नाही काय आपल्याला?
----------------------------------------------------------------------------------------------------

मुळ शेरः   पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
            आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!

सुंदर शेर! एक कुठलेही नाते, प्रेमाचे, स्वतःचे स्वतः शी असलेले किंवा जीवनाशी असलेले! एक आत्मविश्वास दिला जात आहे की त्या नात्यात अजूनही कविता आहे. किती सकारात्मकता! किती ओढ आहे यात त्या नात्याची!

आपला शेरः सोडू हिला कसे... पण सोडू तरी कशाला?
            असते विडंबनाला 'खोक्या' मुळात कविता!

या द्विपदीबाबत मी काही लिहिणार नाही. कारण ती भाषा इथेही अमान्य होईल व आपणालाही वाईट वाटेल. तसेच, त्या भाषेत मी स्वतःहून कधीच बोलत नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------

एकंदर, आपण केलेले विडंबन ( ? ) हे बरेच वैयक्तिक व 'वैयक्तिक नसल्यास' अर्थहीन व 'वैयक्तिक असल्यास' टारगट विनोद करणारे आहे. पुन्हा पुन्हा वेळ घालवून एवढे लिहितो म्हणून मला 'निरुद्योगी' जरूर म्हंटले जाईलही, पण पर्वा नाही.

विडंबनामध्ये संदेश अत्यंत आवश्यक आहे. ( मला व्यक्तिशः बरेच संदेश मिळाले आपल्या रचनेतून... हा हा हा , ) पण ते काही सामाजिक संदेश नाहीत. विडंबन म्हणजे 'सामाजिकच' का असा प्रश्न लगेच विचारण्यात येल. तसेही काही नाही. पण, विडंबनातून समाजाला चांगला संदेश मिळालाच पाहिजे.

आपण जे कुणी आहात, आपल्याबद्दल मला व्यक्ती म्हणून आदर आहेच. पण, विडंबनकार म्हणून शुन्य आदर आहे.